'हेंडगे कुटुंबाला न्याय द्या, फरार संस्थाचालकाला अटक करा'; उखळद ग्रामस्थांचा परभणीत मोर्चा
By राजन मगरुळकर | Updated: July 15, 2025 13:01 IST2025-07-15T13:00:27+5:302025-07-15T13:01:02+5:30
झिरो फाटा येथील हायटेक स्कूलमधील जगन्नाथ हेंडगे यांचे खून प्रकरण

'हेंडगे कुटुंबाला न्याय द्या, फरार संस्थाचालकाला अटक करा'; उखळद ग्रामस्थांचा परभणीत मोर्चा
परभणी : शाळेतून मुलीचा दाखला काढून घेण्यासाठी गेलेल्या पालक जगन्नाथ हेंडगे यांचा संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्रकरण गुरुवारी सायंकाळी घडले होते. यामध्ये अद्यापही फरार संस्थाचालक आणि त्याची पत्नी यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी परभणी तालुक्यातील उखळद येथील ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातून मोर्चा काढला.
शहरातील खानापूर फाटा काळी कमान येथून निघालेल्या मोर्चात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. यामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी, संघटनांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्यासह महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. फरार संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्याची पत्नी या दोघांनी केलेल्या मारहाणीत पालक जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात खूनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले असून रविवारी सायंकाळी गावात ग्रामस्थांची बैठकही झाली होती. तर जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींनी या कुटुंबाची भेट घेऊन सात्वन केले होते.
संबंधित दोन्ही आरोपींना त्वरित अटक करावी यासह हेंडगे कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये वारकऱ्यांसह भजनी मंडळ सुद्धा सहभागी झाले असून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे न्यायाची मागणी करण्यासाठी ग्रामस्थ मोर्च्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या सादर करणार आहेत. पाच दिवसांपासून पोलीस पथक शोध घेत असतानाही आरोपी सापडत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.