गंगाखेडमध्ये ड्रायव्हरचा भरदिवसा खुन;गुन्हेगारांच्या अटकेसाठी नातेवाईक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 19:03 IST2017-11-06T18:51:08+5:302017-11-06T19:03:28+5:30
गंगाखेड शहरात भरदिवसा दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास इलियास खान राजाखान पठाण यांची चाकूने भोसकून हत्या झाली.

गंगाखेडमध्ये ड्रायव्हरचा भरदिवसा खुन;गुन्हेगारांच्या अटकेसाठी नातेवाईक आक्रमक
परभणी : गंगाखेड शहरात भरदिवसा दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास इलियास खान राजाखान पठाण यांची चाकूने भोसकून हत्या झाली. हत्येची माहिती कळताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय व पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी करण्यास सुरु झाली. या घटनेचे शहरात पडसाद उमटले असून शहरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, नगर परिषद स्विकृत सदस्य राजु सावंत यांच्या खाजगी चारचाकी वाहनावर इलियास खान राजाखान पठाण ( 40, रा. महातपुरी ) हे चालक आहेत. आज दुपारी इलियास हे सावंत यांच्या आईला घेवुन डॉक्टर लाईन मधील दवाखान्यात घेवुन आले. तपासणीसाठी दवाखान्यात गेलेल्या सावंत यांच्या आईची ते बाहेर गाडीत वाट पाहत होते. यावेळी अचानक इलियास यांच्यावर अज्ञातांनी चाकूने हल्ला केला व त्यांच्या छातीत चाकू खुपसून त्यांची हत्या केली.
याच दरम्यान जवळच्या मैदानावर खेळण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलांनी गाडी बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इलियास यांना पाहून आरडाओरडा केली. त्यांच्या आवाजाने तेथे जमाव जमला व त्यांनी पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. भरदिवसा शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली. याचे पडसाद शहरात तात्काळ पडले. इलियास यांच्या नातवाईकांना याची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालय व पोलीस स्टेशन परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली. पूर्णा उपविभागाचे डीवायएसपी खान यांच्यासह पो.नि. सोहन माछरे, एल.सि.बी. पथकाने घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. मात्र खुन कुणी व का केला याचा सुगावा लागला नव्हता. तसेच याप्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
जमावाचा रस्ता रोको
खान यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी गंगाखेड पोलीस ठाण्यासमोर जमाव जमला. तसेच जमावाने नांदेड- पुणे महामार्गावर ठाण मांडून रस्ता रोको केला. पोलीसांनी दंगल विरोधी पथक शहरात तैनात केले आहे.