महागाव येथे जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:06+5:302021-05-30T04:16:06+5:30
पूर्णा तालुक्यातील महागाव येथील जिजाभाऊ मोहिते हे वयाच्या २४ व्या वर्षी सैन्यदलात दाखल झाले होते. पठाणकोट पंजाब येथे वायुदलात ...

महागाव येथे जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
पूर्णा तालुक्यातील महागाव येथील जिजाभाऊ मोहिते हे वयाच्या २४ व्या वर्षी सैन्यदलात दाखल झाले होते. पठाणकोट पंजाब येथे वायुदलात कर्तव्य बजावत असताना २७ मे रोजी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जिजाभाऊ मोहिते यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. २८ मे रोजी सायंकाळी पठाणकोट येथे वायुदलाच्या वतीने मानवंदना देत त्यांचे पार्थिव महागावकडे रवाना झाले. २९ मे रोजी रात्री सव्वाआठ वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या गावात पोहोचले. जिजाभाऊ मोहिते यांचे पार्थिव गावात पोहोचताच चाहत्यांना अश्रूधारा अनावर झाल्या. आप्तस्वकीय व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. ‘जिजाभाऊ अमर रहे’, ‘वीर जवान अमर रहे’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. साश्रुनयनांनी वीर जवान जिजाभाऊ मोहिते यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी खा. संजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, ह.भ.प. अच्युत महाराज दस्तपूरकर, सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग मोहिते आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.