१२ तासांनंतर कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST2021-04-19T04:15:47+5:302021-04-19T04:15:47+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल आहे. या रुग्णांवर वेळेत अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेली यंत्रणा कमी पडत आहे. येथील जिल्हा ...

१२ तासांनंतर कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल आहे. या रुग्णांवर वेळेत अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेली यंत्रणा कमी पडत आहे. येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १७ एप्रिल रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने महिलेच्या मृत्यूची माहिती महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला दिली. कोरेानाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह पॅक करण्यासाठी साधारणत: एक तासाचा वेळ लागतो. परंतु, मध्यरात्र असल्याने या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. त्यामुळे नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागले. दुपारी २ वाजेच्या सुमारास या महिलेवर अंत्यसंस्कार झाले.
कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरात एकच रुग्णवाहिका आहे. मागील काही दिवसांपासून मृत्यू वाढत असल्याने रुग्णवाहिकेवर ताण आला आहे. त्यामुळे प्रशासनाने आणखी एक रुग्णवाहिका आणि एक चालक वाढवून द्यावा, त्याचप्रमाणे मृत्यू पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी २४ तास सेवा ठेवावी, अशी मागणी होत आहे.