तलाठी ते गायक! परभणीचे राजू काजे 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये; जिंकली लाखो प्रेक्षकांची मने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:40 IST2025-10-15T18:40:05+5:302025-10-15T18:40:50+5:30
परभणीच्या राजू काजेंचा स्वर झंकारला ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या मंचावर

तलाठी ते गायक! परभणीचे राजू काजे 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये; जिंकली लाखो प्रेक्षकांची मने
- मारोती जुंबडे
परभणी : स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात हे वाक्य खरं ठरवलं ते परभणीतील माजी तलाठी राजू उर्फ लक्ष्मीकांत काजे यांनी. शासकीय कर्तव्य पार पाडताना गाण्याची आवड जोपासणाऱ्या या कलावंताने टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मध्ये आपल्या सुमधुर आवाजाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली.
११ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात राजू काजे यांनी गाणे “ओ मेरे दिल के चैन, चैन आये मेरे दिल को दुआ कीजिए” सादर केले. त्यांच्या आवाजातील गोडवा, भाव आणि सादरीकरणातील सहजता पाहून परीक्षकही थक्क झाले. शोमधील सर्व परिक्षकांनी उभं राहून टाळ्यांचा वर्षाव करत हा आमच्या मंचावर सापडलेला खरा हिरा आहे अशी शाबासकी दिली. त्या क्षणी स्टुडिओतील वातावरण आनंद, कौतुक आणि भावनांनी भारून गेले. परभणीकरांच्या या सुपुत्राने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला, हे पाहून शहरभरातून अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. समाजमाध्यमांवर त्यांच्या गाण्याचे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत असून हा आमचा राजू.. म्हणत परभणीकरांनी त्यांच्या कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.