आता मिळणार मोफत शिवभोजन थाळी; १,५०० जणांचे भरणार पोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:38+5:302021-04-17T04:16:38+5:30
परभणी : जिल्ह्यातील ११ केंद्रांवरील १ हजार ५०० लाभार्थ्यांना आता राज्य शासनाच्या वतीने माेफत शिवभोजन थाळी देण्यात येणार ...

आता मिळणार मोफत शिवभोजन थाळी; १,५०० जणांचे भरणार पोट
परभणी : जिल्ह्यातील ११ केंद्रांवरील १ हजार ५०० लाभार्थ्यांना आता राज्य शासनाच्या वतीने माेफत शिवभोजन थाळी देण्यात येणार आहे. ३० एप्रिलपर्यंत दररोज याचा संबंधितांना लाभ मिळणार आहे.
राज्यभरात कोरोना संकट गडद होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवांनाच सूट देण्यात आली आहे. सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने राज्य शासनाच्या शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तर परभणी शहरात ३ शिवभोजन थाळी केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या केंद्रांवरून दररोज १ हजार ५०० लाभार्थ्यांना आतापर्यंत ५ रुपयात शिवभोजन थाळी देण्यात येत होती. आता या सर्व १ हजार ५०० लाभार्थ्यांना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा या लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. प्रशासनाच्या संचारबंदी नियमांचा यासाठी त्यांना अडसर होणार नाही.
थाळीचा लाभ घेणारे
राज्य शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेमुळे अल्पदरात आणि चांगल्या प्रकारे अन्न मिळत आहे. शासनाने सामाजिक जाणिवेतून घेतलेला हा निर्णय आम्हा सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या निर्णयाचे स्वागत.
- अनिल काळे
कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे हाताला काम नाही. अशात शासनाने १५ दिवस का होईना मोफत शिवभोजन थाळी देण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या हिताचा निर्णय राज्य सरकारकडून होत आहे. याबद्दल शासनाचे आभार.
परभणी येथे शिवभोजन थाळी योजनेंतर्गत चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात येते. शासनाच्या या निर्णयाचा गरीब, मजूर व होतकरू व्यक्तींना लाभ होत आहे. याचे समाधान वाटत आहे.
१५०० जणांना मिळतो दररोज लाभ....
परभणी शहरात दररोज एका केंद्रावर २७५ जणांना शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात येतो. तर गंगाखेड शहरातील केंद्रावर १५० जणांना दररोज या योजनेचा मिळतो.
तालुकास्तरावर प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्रावरून ७५ नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्यामध्ये परभणी वगळता ८ तालुक्याचा समावेश आहे.
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र
११
दररोज किती जण घेतात लाभ
१,५००