नगरसोल-तिरुपती रेल्वेत सापडला चार वर्षांचा बालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:58 IST2018-04-27T17:58:41+5:302018-04-27T17:58:41+5:30
नगरसोल-तिरुपती या एक्स्प्रेस गाडीमध्ये एक चार वर्षाचा बालक पोलिसांना सापडला असून, त्याच्या पालकांचा शोध लागला नसल्याने त्यास सध्या परभणी येथील आशा शिशूगृहात दाखल केले आहे.

नगरसोल-तिरुपती रेल्वेत सापडला चार वर्षांचा बालक
परभणी : नगरसोल-तिरुपती या एक्स्प्रेस गाडीमध्ये एक चार वर्षाचा बालक पोलिसांना सापडला असून, त्याच्या पालकांचा शोध लागला नसल्याने त्यास सध्या परभणी येथील आशा शिशूगृहात दाखल केले आहे.
८ एप्रिल रोजी रात्री २.५० वाजण्याच्या सुमारास नगरसोल- तिरुपती या एक्स्प्रेस रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये हा मुलगा बेवारस स्थितीत आढळला. रेल्वे गाडीत गस्तीवर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण आणि त्यांचे सहकारी संजय पवार यांनी त्यास ताब्यात घेऊन रेल्वे गाडीत चौकशी केली. मात्र त्याचे पालक सापडले नाहीत. त्यामुळे या मुलाची चौकशी करुन त्यास बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. त्यास २६ एप्रिल रोजी आशा शिशूगृह येथे दाखल करण्यात आले आहे.
मुलाचा रंग काळा असून, त्याचा चेहरा गोल आहे. उजव्या कानाजवळ तीळ आहे. हा मुलगा मराठी भाषेत बोलतो आणि स्वत:चे नाव श्याम असे सांगत आहे. या मुलाबाबत किंवा त्याच्या पालकाबाबत माहिती असल्यास अध्यक्ष, बाल कल्याण समिती, जुना पेडगावरोड परभणी किंवा आशा शिशूगृह, उड्डाणपुलाजवळ, नवा मोंढा परभणी किंवा बाल संरक्षण अधिकारी, कल्याणनगर परभणी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.