शॉर्टसर्किटने चार दुकाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST2021-02-25T04:21:28+5:302021-02-25T04:21:28+5:30
परभणी: तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे मंगळवारी रात्री १:३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने चार दुकाने जळून खाक झाली आहेत. या ...

शॉर्टसर्किटने चार दुकाने जळून खाक
परभणी: तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे मंगळवारी रात्री १:३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने चार दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेत ८५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
टाकळी कुंभकर्ण येथे गुलाबराव रमाकांतराव सामाले यांची बसस्थानक परिसरात जागा आहे. या जागेत सुलोचना गुलाबराव सामाले यांच्यासह गोविंद बोंबले यांचे शिलाई मशीन, कल्याण दत्तराव सामाले यांचे रुद्रा ट्रेडिंग कंपनी व भारत बोंबले यांचे ठिबक, तुषार व विद्युत मोटारचे दुकान आहे. या दुकान मालकांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी व्यवसाय करून रात्रीच्या वेळी दुकान बंद करून घरी गेले होते. मात्र मंगळवारी रात्री १:३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन या चारही दुकानांना आग लागली. रात्रीची वेळ असल्याने आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले नाही. मात्र या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत या आगीत चारही दुकाने जळून खाक झाली. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दुकान मालकांनी या घटनेची माहिती वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता यांना दिली. त्यानंतर सहाय्यक अभियंता रवी नितनवरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आगीत जळून खाक झालेल्या चारही दुकानांचा पंचनामा केला. यामध्ये कल्याण दत्तराव सामाले यांच्या रुद्रा ट्रेडिंग कंपनी मधील ३३ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा भुसार माल जळून खाक झाल्याचे या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोविंद बोंबले यांचे शिलाई मशीन दुकान जळून खाक झाले. यामध्ये पाच लाखांचे तर भारत गंगाधरराव बोंबले यांचे ठिबक तुषार व विद्युत मोटारीचे साहित्य जळून ४० लाख नगदी तर रोख २ लाख रुपये असा एकूण ४२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर जागा मालक सुलोचना गुलाबराव सामाले यांचे ४ लाख रुपयांचे नुकसान या घटनेत झाले आहे. त्यामुळे या चारही व्यावसायिकांचे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे या आधीही महानगरपालिकेची पाइपलाइन फुटून तीन ते चार व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची महानगरपालिकेच्या वतीने तोडकी मदत व्यावसायिकांना देण्यात आली होती. त्यातच आता मंगळवारी शॉर्टसर्किट होऊन चार दुकाने जळून खाक झाले आहेत. यामध्ये ८५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. परिणामी या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या नुकसानग्रस्त व्यावसायिकांना मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.