माजी खासदारांना १० रुपयांचे फोन रिचार्ज पडले ४९ हजारांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 18:36 IST2021-02-10T18:32:47+5:302021-02-10T18:36:16+5:30
cyber crime माजी खा.तुकाराम रेंगे यांचे दोन्ही मोबाईल नंबर मंगळवारी अचानक ब्लॉक झाले.

माजी खासदारांना १० रुपयांचे फोन रिचार्ज पडले ४९ हजारांत
परभणी : बंद पडलेले मोबाईल सुरू करण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करुन १० रुपयांचे रिचार्ज करताच खात्यातील ४९ हजार रुपये परस्पर लांबवित येथील माजी खा.तुकाराम रेंगे यांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
येथील माजी खा.तुकाराम रेंगे यांचे दोन्ही मोबाईल मंगळवारी अचानक ब्लॉक झाले. त्यामुळे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी तुकाराम रेंगे यांनी सोपान फाळके यांना जिओ कंपनीच्या कार्यालयात पाठविले होते. त्याच वेळी अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन करुन ब्लॉक झालेले सीमकार्ड लगेच सुरू करण्यासाठी केवळ १० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल, असे सांगितले. त्यासाठी एक ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याची विनंती या व्यक्तीने केली. त्यामुळे तुकाराम रेंगे यांनी सोपान फाळके यांना हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगितले.
हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन त्यावरुन १० रुपयांचे रिचार्ज करण्यासाठी त्यांनी एसबीआयच्या डेबिट कार्डचा वापर केला. तेव्हा काही वेळातच या खात्यातून ४९ हजार रुपये काढून घेतल्याचा मॅसेज मोबाईल क्रमांकावर आला. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच माजी खा.तुकाराम रेंगे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यावरुन गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.