परभणी: विधानसभा निवडणुकांपूर्वी विविध पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग सुरू होते. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांसह आजी-माजी नेत्यांची रांग लागली. मागील अनेक दिवसांपासून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पक्षप्रवेश सुरुच आहेत. यातच आता मराठवाड्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज सिताराम घनदाट(मामा) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेले माजी आमदार आणि अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट भाजपात सामील झाले आहेत. सिताराम घनदाड यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासोबत वंचितकडून पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले सुरेश फड हेदेखील भाजपमध्ये सामील झाले आहेत.
सिताराम घनदाट यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईमध्ये भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रदेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, पाथरी मतदारसंघातील वंचितचे उमेदवार सुरेशराव फड, जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, सरपंच गजानन कांगणे, सरपंच रमेश गिते आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय, बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वात मंठा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, माजी नगराध्यक्ष नितीन राठोड यांच्यासह 10 माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे.