Five years later, the Yaldari fishing business emerged! | पाच वर्षांनंतर येलदरीत मत्स्य व्यवसायाला मिळाली उभारी!
पाच वर्षांनंतर येलदरीत मत्स्य व्यवसायाला मिळाली उभारी!

ठळक मुद्देदीड हजाराहून अधिक कुटूंबियांना आधार मिळाला आहे़गोड्या पाण्यातील येलदरीच्या माशांना वेगळे महत्त्व या प्रकल्पातील माशांना देशभरातून मागणी आहे़

येलदरी (परभणी ) : येलदरी प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने या भागातील मत्स्य व्यवसायाला तब्बल ५ वर्षानंतर उभारी मिळाली असून, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या दीड हजार कुटूंबियांना रोजगाराचे हक्काचे साधन उपलब्ध झाले आहे़

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात मागील चार-पाच वर्षांपासून समाधानकारक पाणीसाठा होत नसल्याने येथील मत्स्य व्यवसाय अडचणीत आला होता़ या प्रकल्पातील माशांना देशभरातून मागणी आहे़ सर्वसाधारणपणे महाराष्ट्रासह इतर राज्यात खाऱ्या पाण्यातील मासे विक्रीसाठी येतात़ त्यामुळे गोड्या पाण्यातील येलदरीच्या माशांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते़ येथील मत्स्य व्यवसाय वाढीस लागत असतानाच येलदरी धरणातील पाणीसाठ्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत होती़ मागील ४ ते ५ वर्षांपासून या प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा झाल्याने हा व्यवसाय अडचणीत सापडला होता़ 

यावर्षीच्या पावसाळ्याच्या अखेरीसही धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा झाल्याने हे वर्षही  दुष्काळी जाते की काय? अशी शंका वाटत असतानाच १५ आॅक्टोबरनंतर परतीच्या पावसाने जोर धरला़ परिणामी येलदरी प्रकल्पात ९९ टक्क्यापर्यंत पाणीसाठा झाला आहे़ या प्रकल्पात झालेल्या पाणीसाठ्यामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठा मत्स्य व्यवसाय पुन्हा एकदा उभारी घेत आहे़ 

या व्यवसायावर अवलंबून असलेल्या दीड हजाराहून अधिक कुटूंबियांना आधार मिळाला आहे़ येलदरी प्रकल्पात झालेला समाधानकारक पाणीसाठा लक्षात घेता राज्य शासनाच्या मत्स्यसंवर्धन विभागानेही पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज सोडून या व्यवसायाला अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

प्रथमच विकसित केला प्रॉन्स
येलदरी येथील प्रकल्पामध्ये ३-४ वर्षापूर्वी प्रथमच प्रॉन्स मासा विकसित करण्यात आला़ या माशालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे़ बाजारपेठेत प्रॉन्स माशामुळे मोठी उलाढाल होऊन मत्स्य व्यावसायिकांना आर्थिक लाभही झाला होता़ प्रॉन्सबरोबरच या प्रकल्पामधील झिंग्यालाही मोठी मागणी असून, यावर्षी जलसाठा झाल्याने या दोन्ही माशांचे उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

मत्स्य व्यवसाय होता अडचणीत
येलदरी प्रकल्पामध्ये दरवर्षी पाणीसाठा खालावत असल्याने या प्रकल्पातील माशांचे प्रमाण कमी झाले होते़ त्यामुळे देशभरात मागणी असलेले गोड्या पाण्यातील मासे शिल्लक राहतात की नाही? अशी शंका निर्माण झाली होती़आता धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यामुळे मत्स्य व्यवसायाला वाव मिळाला असून, गोड्या पाण्यातील मासे पुन्हा एकदा राज्यासह देशभरातील बाजारपेठेत उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे़ 

प्रकल्पात मिळणारे मासे
येलदरी येथील जलाशयात विविध जातींच्या माशांचे उत्पादन केले जाते़ त्यामध्ये कतला, मरळ, चिलापी, बाम, मिरगल, शेंगट, काळूशी, राहू, सुपरनस, वामट या नैसर्गिक गावरान माशांनाही ग्राहकांची मागणी आहे़ त्यामुळे  झिंग्याबरोबरच नैसर्गिक गावरान माशांचेही उत्पादन या जलाशयातून घेतले जाणार आहे़ 

Web Title: Five years later, the Yaldari fishing business emerged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.