गंगाखेड नगर परिषदेच्या लेखा विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:42 IST2018-07-06T13:41:44+5:302018-07-06T13:42:20+5:30
नगर परिषद कार्यालयातील लेखा विभागाला काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

गंगाखेड नगर परिषदेच्या लेखा विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग
गंगाखेड (परभणी ) : नगर परिषद कार्यालयातील लेखा विभागाला काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या इमारतीत मुक्कामी थांबलेल्या वारकऱ्यांच्या लक्षात हि बाब आल्याने पुढील अनर्थ टळला.
नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीत गुरुवारी (दि. ५ ) रात्री शेगाव ते पंढरपुर कडे जाणारी श्री गजानन महाराज यांची पालखी मुक्कामी थांबली होती. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास लेखा विभाग कक्षाला आग लागल्याचे बांधकाम विभाग कक्षात झोपलेल्या वारकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने इमारती बाहेर धाव घेऊन वॉचमनला याची माहिती दिली. त्याचवेळी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलात कार्यरत कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
आग लागल्याचे समजताच मुख्याधिकारी नानासाहेब कामटे, कार्यालयीन अधीक्षक भगवान बोडखे, स्वछता निरीक्षक वसंतराव वाडकर, विलास तातोडे, शेख गफार, रामविलास खंडेलवाल, स्विकृत सदस्य दिपक तापडिया यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तब्बल १ तासानंतर आग आटोक्यात आली.
महत्वाची कागदपत्रे सुरक्षित
आगीत तीन कपाटापैकी एका कपाटाला मोठी झळ पोहचली. यात कपाटावर ठेवलेले कागदपत्रे, दोन संगणक संच, झेरॉक्स मशीन, प्रिंटर आदी जळुन खाक झाले. याच कक्षात असलेले इन्व्हर्टर तसेच बॅटरी तातडीने बाहेर काढण्यात आली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. महत्वाची सर्वच कागदपत्रे सुरक्षित असल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले आहे.