काळ्याबाजारात जाणाऱ्या रेशनच्या 500 पोती तांदूळ प्रकरणात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 17:34 IST2020-09-05T17:32:24+5:302020-09-05T17:34:18+5:30
गोरगरीब जनता कोरोनाच्या या संकटाचा सामना करीत असताना त्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रकार मानवतमध्ये उघडकीस आला.

काळ्याबाजारात जाणाऱ्या रेशनच्या 500 पोती तांदूळ प्रकरणात गुन्हा दाखल
मानवत : लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना देण्यासाठी सरकारने दिलेला 500 पोती तांदूळ काळ्याबाजारात जाताना 22 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्ग 61 वरील रूढी पाटीजवळ पोलिसांनी पकडला होता. गोरगरीब जनता कोरोनाच्या या संकटाचा सामना करीत असताना त्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रकार मानवतमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस चौकशीनंतर शनिवारी ( दि. 5 ) चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 22 ऑगस्ट रोजी रात्री साडे सात वाजता वाजेच्या दरम्यान एका ट्रकमध्ये (आर जे 04 - BG 8888 ) शासकीय रेशनचा गहू जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोनिउमेश पाटील, पोउनि नागनाथ तुकडे, दिलीप मुरमुरे,शेख रसूल, समीर पठाण यांच्या पथकाने हा ट्रक राष्ट्रीय महामार्गावरील रूढी पाटी जवळ ट्रक पकडला होता. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी पुरवठा निरीक्षक नरेंद्र उखळकर व तलाठी अरविंद चव्हाण यांनी या ट्रकचा पंचनामा केला. सदरील तांदूळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता.
दरम्यान, पोलिस चौकशीत हा तांदूळ तीन जणांनी ट्रकमध्ये भरल्याचे समोर आले. पोउनि नागनाथ तुकडे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक पेमराम चौधरी रा. बाडमेर राजस्थान, गणेश रद्दकंठवार, बळीराम माने यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोनि उमेश पाटील करीत आहेत.