परभणीत मुलांच्या जात पडताळणीसाठी पित्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 15:16 IST2018-07-02T15:10:03+5:302018-07-02T15:16:04+5:30
मुलांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने पित्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी जायकवाडी परिसरातील समाजकल्याण कार्यालयात घडली.

परभणीत मुलांच्या जात पडताळणीसाठी पित्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
परभणी : मुलांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने पित्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी जायकवाडी परिसरातील समाजकल्याण कार्यालयात घडली. पोलिसांनी तत्काळ या पित्याला ताब्यात घेतले आहे. सय्यद नजीर सय्यद यासीन (४२, रा.इकबालनगर) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
सय्यद नजीर यांना तीन अपत्य असून तिघांचेही जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने ते मागील काही दिवसांपासून त्रस्त होते. विशेष म्हणजे त्यांच्या भावाचे जात प्रमाणपत्र वैध झाले असताना मुलांचे वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने ते मागील काही दिवसांपासून त्रस्त होते. जात पडताळणी समितीचे पदाधिकारी जाणीवपूर्वक अडवणूक करीत असल्याचा आरोप करीत स.नजीर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
या इशाऱ्यानुसार समाजकल्याण परिसरात पोलीस बंदोबस्त लावला होता. मात्र दुपारी १२ वाजेच्या सुमारास स.नजीर हे कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, पोकॉ.शेख जलील, महमद गौस यांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला.