मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन
By मारोती जुंबडे | Updated: January 13, 2024 19:12 IST2024-01-13T19:12:02+5:302024-01-13T19:12:31+5:30
मराठा आरक्षण मिळावे, या आशयाचा मजकुर लिहलेली चिठ्ठी आढळून आली.

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन
परभणी : तालुक्यातील सनपुरी येथील एका ३४ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. सचिन रामराव शिंदे असे मयत युवकाचे नाव आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्हासह राज्यात ठिकठिकाणी झालेल्या मोर्चे व बैठकांमध्ये परभणी तालुक्यातील सनपुरी येथील सचिन रामराव शिंदे (३४) हा तरुण उपस्थित राहत होता. मात्र मागील काही दिवसापासून आरक्षण मिळत नसल्याने सचिन शिंदे हा चिंताग्रस्त झाला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास सचिन शिंदे या युवकाने सनपुरी शिवारातील एका झाडाला गळफास घेतल्याचे समोर आले.
घटनास्थळी मराठा आरक्षण मिळावे, या आशयाचा मजकुर लिहलेली चिठ्ठी आढळून आली. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. तेव्हा नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन शिंदे हा तरुण आरक्षणासाठी आग्रह होता. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.