गोदावरी नदीतून पोकलेनद्वारे वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:17 IST2021-04-09T04:17:41+5:302021-04-09T04:17:41+5:30
गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून पोकलेनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून, याकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी पूर्णत: ...

गोदावरी नदीतून पोकलेनद्वारे वाळू उपसा
गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून पोकलेनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून, याकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केल्याने वाळूमाफियांचे चांगलेच फावत आहे.
गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, आनंदवाडी, भांबरवाडी, पिंप्री या चार वाळू धक्क्यांचा लिलाव झालेला आहे. भांबरवाडी वाळू पट्ट्यात पाणी आल्याने गोदावरी नदीत अनधिकृत माती बंधारा बांधून हे पाणी अडविण्यात आले आहे. मुळी ते दुसलगावदरम्यान हा अनधिकृत बंधारा उभारल्याची लेखी माहिती दुसलगावच्या पोलीस पाटील संगीता कचरे यांनी तहसीलदार स्वरूप कंकाळ व पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना दिली आहे. तरीही याबाबत कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तालुक्यातील चिंच टाकळी, गौंडगाव, नागठाणा, मुळी, दुसलगाव आदी गावांमधील वाळू घाटांचा अद्याप लिलाव झालेला नाही. तेथेही नियमबाह्यरित्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. यासाठी पोकलेनचा सर्रासपणे वापर केला जात आहे. त्यामुळे गोदावरीचे नदीपात्र धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, ब्रेक दी चेन या अंतर्गत शासनाने रात्री संचारबंदी लागू केली असताना तालुक्यात सर्रासपणे वाळू नेणाऱ्या वाहनांची वर्दळ पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भत कारवाई करण्यास महसूल विभागाचे अधिकारी धजावत नाहीत. त्यामुळे वाळूमाफियांना महसूल विभागाकडून का अभय दिले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष देवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नियमाला दिली बगल
तालुक्यातील महातपुरी, अनंतवाडी, भांबरवाडी, पिंपरी येथील वाळूघाटांचा लिलाव झालेला आहे. नियमानुसार येथून मजुरांमार्फत वाळू उपसा करणे आवश्यक असताना थेट पोकलेन व अन्य यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे नियमाबाह्यरित्या वाळू उपसा होत असताना याकडेही पाहण्यास महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळेनासा झाला आहे. परिणामी महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे वाळूमाफियांशी साटेलोटे आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.