परदेशी पानपक्षी जिंतुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:51 IST2021-01-08T04:51:01+5:302021-01-08T04:51:01+5:30

परभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचा जलाशय आणि पूर्णा नदीपात्राच्या परिसरात मोठ्या संख्येने परदेशी पानपक्षी दाखल झाले आहेत. दोन ...

Exotic leaf birds enter Jintura | परदेशी पानपक्षी जिंतुरात दाखल

परदेशी पानपक्षी जिंतुरात दाखल

परभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचा जलाशय आणि पूर्णा नदीपात्राच्या परिसरात मोठ्या संख्येने परदेशी पानपक्षी दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षीमित्रांनी केलेल्या निरीक्षणात या नोंदी घेण्यात आल्या आहेत.

जिंतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जैवसंपदा आहे. इटोली भागातील वन क्षेत्र, पूर्णा नदीवरील येलदरी धरण आणि छोट्या-मोठ्या तलावांमुळे या तालुक्यात अनेक ठिकाणी ही जैवसंपदा निसर्गाच्या सौंदर्यात भर घालते. त्यामुळे पर्यावरण प्रेमींसह पक्षीमित्र आणि प्राणी मित्रांसाठी जिंतूर तालुक्याचा परिसर नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतो. दरवर्षी हिवाळ्यात या भागात विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. हे पाहुणे काही काळ या भागात वास्तव्य करून काही महिन्यांतच परततात. या भागात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये बहुतांश पानपक्ष्यांचा समावेश आहे. येथील पक्षीमित्र अनिल उरटवार यांनी तालुक्यातील केहाळ परिसरात निर्माण झालेल्या खदाणीत तीन दिवस पक्षी निरीक्षण केले. त्यात अनेक विदेशी पक्ष्यांच्या नोंदी त्यांनी घेतल्या आहेत. त्यामध्ये लालसरी या पानपक्ष्यासह विविध जातींच्या बदकांच्या नोंदी त्यांनी घेतल्या आहेत. साधारणत: १४ प्रकारचे पाणपक्षी या ठिकाणी विदेशातून दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे देशांतर्गत स्थलांतर करणाऱ्या पाणपक्ष्यांनीही हा परिसर आता फुलून गेला आहे.

दाखल झालेले विदेशी पाहुणे

तालुक्यातील केहाळ, येनोली येथील तळे, रायखेडा, मैनापुरी या भागात पानपक्षी दाखल झाले आहेत. स्थलांतरित विदेशी पक्ष्यांमध्ये तलवार बदक (नार्देन पिंटाईल), नकटा बदक (नॉब बिल्ड डक), पिवळा धोबी, भुवई बदक, हिरवा टिलवा, सामान्य तुतारी, पांढरा धोबी, गुलाबी मैना, सामान्य खारूची, मलिन बदक, ठिपकेवाला तुतारी, चक्रांग बदक, छोटी लालसरी, पिवळ्या डोक्याचा धोबी, थापट्या बदक या पानपक्ष्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांमध्ये चित्र बलाक, हळदी कुंकू बदक, शेकाट्या, काळ्या डोक्याचा शटारी, मोर शटारी, गाय बगळा, मोठा बगळा, मध्यम बगळा, अडई, वारकरी, सामान्य खंड्या या पक्ष्यांचा समावेश आहे.

युरोपातून येतात पक्षी

लडाख, तिबेट, रशिया, सायबेरिया, मलेशिया, युरोप आदी भागांतून हिवाळ्यात हे पक्षी जिंतूर तालुक्यात दाखल होतात. उत्तरेकडे बर्फवृष्टी झाल्याने तलाव बर्फाने झाकले जातात. त्यामुळे अन्न मिळणे कठीण झाल्याने हे पक्षी स्थलांतर करतात. जिंतूर तालुक्यात हिवाळ्यात दरवर्षी स्थलांतरित पक्षी पाहावयास मिळतात. ठरलेल्या ऋतूमध्येच पक्ष्यांचे स्थलांतर होते. मुख्यत: खाद्याचा तुटवडा जाणवल्याने हे स्थलांतर होते, तर काही पक्षी प्रजननासाठीही स्थलांतर करतात, असे पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी सांगितले.

Web Title: Exotic leaf birds enter Jintura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.