विद्यमान नगरसेवक सुरक्षित प्रभागाच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:38+5:302021-02-08T04:15:38+5:30

गंगाखेड नगर परिषदेची मुद्दत चालू वर्षाअखेर संपणार आहे. तसेच पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता निर्माण ...

Existing councilors in search of safe wards | विद्यमान नगरसेवक सुरक्षित प्रभागाच्या शोधात

विद्यमान नगरसेवक सुरक्षित प्रभागाच्या शोधात

गंगाखेड नगर परिषदेची मुद्दत चालू वर्षाअखेर संपणार आहे. तसेच पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०१६ मध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर पाच वर्ष शहरातील विकास कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षातील पुढाऱ्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांची जुळवा-जुळव करत आगामी नगर परिषदेच्या निवडणूक मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचे चित्र राजकीय पटलावर होणाऱ्या हालचालीवरून पहावयास मिळत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून आणि संयुक्त प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते. मात्र आता नगर परिषदेच्या निवडणुका जुन्या पद्धतीच्या वॉर्ड रचनेतून होणार असल्याचे तसेच नगराध्यक्ष पद ही नगरसेवकांतून निवडल्या जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले हवसे, गवसे, नवसे आतापासूनच कामाला लागल्याचे दिसत आहे. गत निवडणुकीत प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी प्रभागातील साध्या समस्या सोडविल्या नसल्याचे खुद्द मतदारच बोलून दाखवत आहेत. सद्य:स्थितीत नगर परिषदेच्या सभागृहात असलेल्या काही विद्यमान नगरसेवकांनी आपल्या सोयीचे सुरक्षित वॉर्ड शोधायला सुरुवात केल्याचे ही पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत शहरातील राजकीय पक्षात कोणाकडे कार्यकर्त्यांचा तर कोणाकडे उमेदवारांचा अभाव असल्याने याची जुळवा जुळव करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून, आयाराम, गयारामची या पक्षातून त्या पक्षात आवक-जावक ही सुरू झाल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीतील नेत्याचे एकमत होणार का?

गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, रासपा आदी राजकीय पक्षांनी बारा प्रभागांसह नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. यात गंगाखेडनगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजयकुमार तापडिया थेट जनतेतून निवडून आले होते, तर नगरसेवक म्हणून त्यांच्या काँग्रेस पक्षाचे ८, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ६, भाजपचे ४, रासपाचे ३, शिवसेनेचे २ नगरसेवक व अपक्ष १ नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी एकत्र आलेल्या काँग्रेस, रासपा, शिवसेना या पक्षात पुढे बेबनाव झाल्याने रासपाच्या उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव पारित झाल्याने रासपाच्या उपनगराध्यक्षांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतरच्या घडामोडीत उपनगराध्यक्ष पद काँगेसच्याच पारड्यात पडले होते. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याची सत्ता मिळविल्याने राज्यात या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीची ताकद वाढलेली दिसत असली तरी गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकित महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमत होईल हे सांगणे कठीण आहे.

Web Title: Existing councilors in search of safe wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.