गुन्हेगारांची सराईत टोळी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:51 IST2021-01-08T04:51:03+5:302021-01-08T04:51:03+5:30
परभणी : शहरासह ग्रामीण भागात विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळीच्या गुन्ह्यांमध्ये आणि सदस्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने नितेश ...

गुन्हेगारांची सराईत टोळी हद्दपार
परभणी : शहरासह ग्रामीण भागात विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळीच्या गुन्ह्यांमध्ये आणि सदस्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने नितेश प्रकाशराव देशमुख व टोळीतील ६ सदस्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढला आहे.
नितेश प्रकाशराव देशमुख (रा.देशमुख गल्ली) व टोळीतील इतर १९ सदस्यांविरुद्ध नानलपेठ, नवा मोंढा, कोतवाली आणि दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००२ ते २०२० पर्यंत एकूण ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणे, जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, पुरावा नष्ट करणे, अपहरण, चोरी, विनयभंग, सरकारी कामात अडथळा, जातीवाचक शिवीगाळ, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे आदी गुन्हेगारी कृत्य या टोळीतील सदस्यांकडून केले जात होते. वारंवार कारवाई करुनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने नानलपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. विशेष म्हणजे, या प्रस्तावावर सुनावणी सुरू असतानाही या टोळीकडून खुनाचा प्रयत्न व चोरीचे गुन्हे घडवून आणले.
या सर्व बाबी विचारात घेऊन टोळी प्रमुख नितेश प्रकाशराव देशमुख, सदस्य अनिल नागोराव झाटे, गजानन बाळासाहेब चव्हाण, गौरव सुरेशराव देशमुख, देवानंद विठ्ठल चव्हाण, हनुमान जानकीराम रायमले, सचिन अनिलराव पवार यांना परभणी जिल्ह्यातून ९ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढले आहेत.
त्याचप्रमाणे मो.इक्रमोद्दीन मो.आसेफोद्दीन, शैलेश रमेश चव्हाण, महेश रुस्तुमराव खलाळ, राहुल पंढरीनाथ घोडके, वैभव विश्वनाथ झोडपे, विजय गंगाराम खुणे, महेश संभाजीराव साखरे, संतोष भरतराव झाडे, कन्हैय्या उर्फ राजू उर्फ राजेंद्र रामराव पवार, मंगेश मुरली दीपके, नारायण हरिभाऊ खाडे, गौतम उर्फ बाबा पुरभाजी वायवळ आणि सुरेश दीपक शेळके या १३ सदस्यांनी नऊ महिने नानलपेठ पोलीस ठाण्यात दुसऱ्या व चौथ्या सोमवारी हजेरी लावावी. तसेच १० हजार रुपयांचे बंधपत्र व चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र सक्षम साक्षीदारासह हजर करण्याचे आदेश मीना यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे व सहकारी कर्मचाऱ्यांनी या सातही आरोपींना हद्दपार क्षेत्राच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सोडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.