नांदखेडा रोडवरील कॅनॉलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By ज्ञानेश्वर भाले | Updated: April 13, 2023 15:30 IST2023-04-13T15:29:30+5:302023-04-13T15:30:13+5:30
शहरातील विद्यानगर ते नांदखेडा रोड या रस्त्यावर बेलेश्वर महादेव मंदिराच्यालगत कॅनॉलमधील घटना.

नांदखेडा रोडवरील कॅनॉलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
परभणी : शहरातील नांदखेडा रोडवरील बेलेश्वर मंदिराजवळून वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक मृतदेह तरंगत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. या घटनेची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेस्क्यू करून मृतदेह बाहेर काढला.
शहरातील विद्यानगर ते नांदखेडा रोड या रस्त्यावर बेलेश्वर महादेव मंदिराच्या लगत कॅनॉल आहे. या कॅनॉलमध्ये सध्या पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास कॅनॉलच्या कठड्यालगत एका ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिला. यानंतर सदरील माहिती नागरिकांनी नानलपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाला कळविली. तसेच अग्निशमन दलालासुद्धा सांगितली. त्यावरून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यावर रंगत असलेला हा मृतदेह कॅनॉलच्या बाहेर काढला. त्यानंतर सदरील मृतदेह नानलपेठ पोलिसांच्या स्वाधीन केला. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. याप्रकरणी पुढील पंचनामा आणि शवविच्छेदन प्रक्रिया नानलपेठ पोलिसांनी पूर्ण केली.