धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा
By विजय पाटील | Updated: January 4, 2025 17:20 IST2025-01-04T17:19:19+5:302025-01-04T17:20:03+5:30
संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा
परभणी : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील आरोपींना पुण्यात कोणी मदत केली, या आरोपींना मदत करणाऱ्या मंत्र्याला कधी मंत्रिमंडळातून हाकलणार, असे सवाल करीत परभणी येथील मोर्चास संबोधित करणाऱ्या सर्वच नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक टीका केली. तर हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
परभणी येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून १२:३० वाजता काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नेतेमंडळी व बीड जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांनीही सहभाग नोंदविला. स्थानिकच्या सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. आजी-माजी अनेक लोकप्रतिनिधी यात सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी विविध फलके हाती घेऊन ही मंडळी सहभागी झाली होती. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचल्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत मान्यवरांची भाषणे झाली.
सर्वांना मकोका लावा : आ. सुरेश धस
संगीत दिघोळे ते संतोष देशमुखपर्यंत परळीत किती हत्या झाल्या, त्यामागे कोण आहे, हे तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीहून माणसे पाठविली पाहिजे. तर धनंजय मुंडे मंत्री राहिले तर हे असेच सुरू राहील. त्यांच्याऐवजी परभणीतील राजेश विटेकरांना मंत्री करा, कायंदेंना करा, सोळंकेंना करा, असे आधीच अजित पवारांना सांगितले आहे.
मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे: आ. संदीप क्षीरसागर
बीड जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल होतात. तपास वाल्मीक कराडच्या दिशेने गेला की थांबतो. त्यांच्या काळातले मंत्री त्यांना सांभाळायचे. आताही या प्रकरणाचा तपास होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सीडीआर तपासून जे दोषी आढळतील, त्यांना फासावर लटकवले पाहिजे.
चार्जशिटमध्ये त्रुटी राहू नये : खा. संजय जाधव
या प्रकरणाचा योग्य तपास करून योग्य चार्जशिट दाखल व्हावी. पुराव्याअभावी यांनी अनेक खून पचवले. त्यामुळे अशा त्रुटी राहिल्या नाही पाहिजे. परळीची स्थिती बिहारला लाजवेल, अशी आहे. राजकीय वरदहस्ताने धाडस वाढत चालले. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. तर ज्याचा खून झाला, त्याच्या भावाला धमकी देण्याची ताकद येते कुठून? समाजात खदखद आहे. ती उफाळणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. परळीसारखीच आमच्या गंगाखेडमध्ये स्थिती आहे. मात्र, त्याला आम्ही आवरू.
...तर मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाही : मनोज जरांगे
संतोष देशमुख गेलेत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते म्हणाले की, आपल्या समाजाला त्रास झाला तर तोडीस तोड उत्तर द्यायचे. ते जर माणसांचे मुडदे पाडायला लागले तर पर्याय नाही.
समाजाने असेच पाठीशी राहावे : वैभवी देशमुख
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी यावेळी म्हणाली की, आज मला माझ्या वडिलांचा तो हसरा चेहरा दिसत नाही. त्यांना आमच्यापासून हिरावले. त्यांनी समाजासाठी काम केले. आज समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही येथे आलात. असाच तुमचा हात माझ्या व माझ्या भावाच्या पाठीवर कायम राहू द्या. असेच सोबत राहा.