प्रत्येक पक्षाला हवाय 'मोठा भाऊ'चा मान; पडद्याआडून 'सेटलमेंट'चा खेळ
By विजय पाटील | Updated: December 19, 2025 11:46 IST2025-12-19T11:45:44+5:302025-12-19T11:46:13+5:30
सर्वच पक्षांकडून बोलणी आहे सुरू; तीन-तीन पक्षांनी एकत्र येणे आहे अवघड, सगळेच स्वतंत्र लढल्यास बहुरंगी लढतीत अंदाजही बांधणे होणार कठीण

प्रत्येक पक्षाला हवाय 'मोठा भाऊ'चा मान; पडद्याआडून 'सेटलमेंट'चा खेळ
विजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी महापालिकेसाठी आधी सर्वच पक्षांना स्वबळ आजमावायचे होते. आता काहीसा नूर बदलला. मात्र युती व आघाडीची गणिते जुळल्यास चुरशीच्या लढतींची शक्यता आहे. मात्र सर्वच पक्षांना मोठा भाऊ होण्याची आस असल्याने सूर जुळणे अवघड आहे. सेटलमेंटचे राजकारण हा येथे परवलीचा शब्द असला तरीही यामुळे वरवर दिसणारी गणिते पडद्याआडून बदलतात.
परभणी मनपावर मागच्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप व शिवसेनेचे संख्याबळ सत्तेच्या कोसोदूर होते. आता राज्यात सत्ता असल्याने भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदेसेनेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र आपसात लढाई झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस उचलेल, अशी सर्वानाच भीती आहे. दुसरीकडे काँग्रेससोबतच यावेळी शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी श.प. गटही ताकदीने लढण्याची भाषा करीत आहे. एमआयएम, वंचित, यशवंत सेना रिंगणात येणार आहे. ते कोणाचे गणित बिघडवणार? हा प्रश्न आहे. तर युती व आघाडी बोलणीतच असल्याचे दिसते.
एकूण प्रभाग किती आहेत ? - १६
एकूण सदस्य संख्या किती ? - ६५
कोणते मुद्दे निर्णायक ?
परभणीत रस्ते, भुयारी गटार योजना, कचरा कोंडी हे प्रमुख प्रश्न कायम आहेत. वारंवार या प्रश्नांवर आंदोलने करावी लागतात.
विकासाची न होणारी कामे हाच येथील प्रमुख मुद्दा आहे. मनपातील प्रशासकीय अनागोंदीही कायम असते. मनपा अभियंते पुढाऱ्यांशी भागिदारीत काम करून लूट करतात.
नाट्यगृह, ठोक निधीतून होणाऱ्या रस्त्याची कामे, उद्यान आदी कामे मागील अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
काँग्रेस - ३१
राष्ट्रवादी काँग्रेस - १९
भाजप - ०८
शिवसेना - ०५
एमआयएम - ०१
इतर - ०१
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती ?
एकूण - २,१२,८८८
पुरुष - १,१२,१२७
महिला - १,००,७७१
इतर - ०
आता एकूण किती मतदार ?
एकूण - २,६१,२३९
पुरुष - १,३२,५९५
महिला - १,२८,६३५
इतर - ०९
मतदार यादींवरील आक्षेप निकाली पण समस्या कायम: परभणी मनपाच्या मतदार यादीवरीर १६६१ आक्षेप निकाली काढले. मात्र अजूनही दुसऱ्या भागातील नावे आली किंवा आमची तिकडे गेली, हे तक्रार कायम आहे.