परभणी शहरातील घटना : नगरसेवक रोडे यांच्या खूनानंतर बाजारपेठ झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:04 IST2019-03-31T23:04:50+5:302019-03-31T23:04:55+5:30
येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर विविध भागातील व्यापारी प्रतिष्ठाने स्वत:हून व्यापाऱ्यांनी रविवारी बंद केली़

परभणी शहरातील घटना : नगरसेवक रोडे यांच्या खूनानंतर बाजारपेठ झाली बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर विविध भागातील व्यापारी प्रतिष्ठाने स्वत:हून व्यापाऱ्यांनी रविवारी बंद केली़
शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा जायकवाडी वसाहत परिसरात रविवारी खून झाला़ सकाळी १० च्या सुमारास या बाबतची माहिती वाºयासारखी शहरात पसरली़ त्यानंतर उघडण्यात आलेली खानापूर फाटा, सुपरमार्केट, वांगी रोड, सरकारी दवाखाना परिसर, सुभाष रोड आदी भागातील व्यापारी प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद केली़ अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ पोलिसांनी घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला़ यावेळी जिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती़ जवळपास ३ वाजेपर्यंत येथील गर्दी कायम होती़ यावेळी उपस्थितांनी जोपर्यंत आरोपींना ताब्यात दिले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेतली़ त्यामुळे पोलिसांची धावपळ सुरू झाली़ शहर पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी, पोलीस उपअधीक्षक तृप्ती जाधव यांनी उपस्थितांची समजूत काढली़
आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना नियमानुसार तपासांती कठोर शासन केले जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले़ यावेळी उपस्थित जनसमुदायाने आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी घोषणाबाजी सुरू केली़ त्यानंतर पोलिसांनी जमावाला शांत केले़
त्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास मयत अमरदीप रोडे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला़ दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी चोख बंदोबस्त लावला होता़