भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या पाहणीनंतरही गंगाखेडमधील गूढ आवाजाचा उलगडा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:07 IST2020-08-25T18:07:22+5:302020-08-25T18:07:40+5:30
गंगाखेड शहर व परिसरात सोमवारी अचानक झालेल्या धमाकेदार आवाजामुळे शहरवासीयांत खळबळ उडाली होती.

भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या पाहणीनंतरही गंगाखेडमधील गूढ आवाजाचा उलगडा नाही
गंगाखेड : शहर परिसरात सोमवारी सकाळी ११:४५ वाजेच्या सुमारास झालेल्या धमाकेदार आवाजाचा उलगडा भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेला करता आला नाही. यामुळे नागपूर येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण कार्यालयाशी पत्रव्यवहार करून त्यांच्या पथकाला पाचारण केले जाणार असल्याची माहिती आहे.
गंगाखेड शहर व परिसरात सोमवारी अचानक झालेल्या धमाकेदार आवाजामुळे शहरवासीयांत खळबळ उडाली होती. हा आवाज कशाचा याबद्दल शहरवासीयांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी लातूर येथील भूकंप रोधक यंत्रात भूकंप झाल्याची काही नोंद झाली आहे का याची माहिती घेतली. मात्र, भूकंप झाला नसल्याचे या यंत्रणेने कळविले.
यानंतर मंगळवारी (दि. २५ ) दुपारी तीन वाजेच्या सुमारास परभणी येथील भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील वरीष्ठ लिपीक प्रशांत पोळ यांनी गंगाखेड येथे येऊन नायब तहसीलदार डी. डी. धोंगडे, तलाठी चंद्रकांत साळवे व अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेत शहरातील विविध ठिकाणी पाहणी केली. तसेच शहरवासीयांकडून माहिती जाणून घेतली. शहर परिसरात झालेल्या आवाजाचे कारण स्पष्ट न झाल्याने या आवाजाबद्दलचे कारण शोधण्यासाठी नागपूर येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तेथील पथकामार्फत चौकशी करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार असल्याचे पोळ यांनी सांगितले. यामुळे शहरातील आवाजाचे उकल न झाल्याने याचे गूढ कायम राहिले आहे.
पत्नीसह इतरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत #coronavirushttps://t.co/HiI5DBsgnA
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020