परभणीत मनोरंजन प्रकल्प साकारणार - पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST2021-02-27T04:23:22+5:302021-02-27T04:23:22+5:30
परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यानात संगीत कारंजे व मनोरंजन प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी आ. डॉ. राहुल पाटील यांनी जागेची पाहणी ...

परभणीत मनोरंजन प्रकल्प साकारणार - पाटील
परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यानात संगीत कारंजे व मनोरंजन प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी आ. डॉ. राहुल पाटील यांनी जागेची पाहणी केली. या वेळी मनपा आयुक्त देविदास पवार, अभियंते व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले, परभणी जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारा हा मनोरंजन प्रकल्प असेल. पंधरा हजार फूट जागेवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. मराठवाड्यातील सर्वात ‘उंच राष्ट्रध्वज’ परभणीच्या राजगोपालाचारी उद्यानात साकारणार आहोत. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात उंच तिरंगा ध्वज आकाशाला गवसणी घालताना आपण अनेकदा पाहिले. ते पाहून अभिमानाचे, देशभक्तीचे स्फुरण चढते. मात्र, आपल्या परभणी जिल्ह्यातसुद्धा असा राष्ट्रध्वज उभारावा, अशी अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी होती. त्यानुसार शहरातील राजगोपालाचारी उद्यानात उंच राष्ट्रध्वज व म्युझिकल कारंजे उभारणार आहोत. यासाठी जागेची पाहणी केली आहे. याकरिता अडीच कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीकडून हा निधी मंजूर झाला आहे. रात्रीच्या वेळी या ध्वजावर प्रकाशझोत सोडला जाईल. त्यामुळे ते आगळे आकर्षण ठरेल. पर्यटनाच्या दृष्टीनेसुद्धा हे उपयुक्त ठरेल. प्रत्येक नागरिकाला डोळ्यांपुढे राष्ट्रध्वज दिसत राहिला, तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत होईल, या हेतूने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार असल्याचे आ. डॉ. पाटील म्हणाले.