परभणी : तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या साडेतीन किलोमीटर रस्त्याचे आठ दिवसांपूर्वी आशीर्वाद कन्स्ट्रक्शनने डांबरीकरण केले. मात्र, या डांबरीकरणात ११ ठिकाणी ठिगळे देण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरी भागाला जोडण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या साडेचार किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी मिळाली. त्यासाठी साडेतीन कोटी रुपयांच्या निधीही मंजूर झाला. याच वर्षात रस्त्याच्या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या वेळेमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होऊन ९ गावांमधील ग्रामस्थांना परभणी शहर गाठण्यासाठी गुळगुळीत रस्ता तयार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १२ महिन्यांत काम पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला १० हजार रुपये प्रतिआठवडा दंडही ठोठावण्यात आला. त्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ची मुदत देण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीतही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व अधिकाऱ्यांच्या तगाद्यानंतर संबंधित कंत्राटदाराने एप्रिल २०२१मध्ये या रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र, ८ दिवसांपूर्वी केलेल्या या रस्त्यावरील डांबरीकरणाला ११ ठिकाणी ठिगळे देण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत ग्रामस्थांच्या मनामध्ये शंका उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम करताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते की काय? असा प्रश्नही आता ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रस्त्याच्या कामाची पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी ९ गावांमधील ग्रामस्थांनी केली आहे.
पुलाच्या कामातही निविदेतील नियमांना खो
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षातील मंजुरी मिळालेल्या टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्याबरोबरच याच निधीतून कुंभारी बाजार ते कारला या ६०० मीटर रस्त्याचे व एका पुलाचे काम करण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, संबंधित ठेकेदाराने कुंभारी गावाजवळील एका ओढ्यावर बांधण्यात आलेल्या पुलासाठी निविदेत दिलेल्या नियमांना व अटींना खो दिल्याचे कुंभारी ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.
डांबरीकरण करताना ज्याठिकाणी रस्ता खाली-वर झाला होता, अशाठिकाणी संबंधित गुत्तेदारांना डांबरीकरणाचा डबल लेअर टाकण्यास सांगण्यात आले. रस्त्याच्या कामाची पाच वर्षे देखभाल, दुरुस्तीही संबंधित कंत्राटदाराकडे आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही.
- एस. एम. पडोळे, कनिष्ठ अभियंता, परभणी.