जिल्ह्यातील १ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST2021-04-07T04:17:55+5:302021-04-07T04:17:55+5:30
सहकार क्षेत्रातील मुदत संपलेल्या सहकारी संस्था आणि बँकांची निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश गतवर्षी राज्य शासनाने दिले होते. त्यानंतर गेल्या ...

जिल्ह्यातील १ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
सहकार क्षेत्रातील मुदत संपलेल्या सहकारी संस्था आणि बँकांची निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश गतवर्षी राज्य शासनाने दिले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा फैलाव कमी झालेला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत १८ मार्च २०२०, १७ जून २०२०, २८ सप्टेंबर २०२०, १६ जानेवारी २०२१ व २४ फेब्रुवारी २०२१ असे पाचवेळा आदेश काढून या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेरच्या आदेशात ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती; परंतु सध्या दुसरी कोरोनाची लस आली आहे. परिणामी बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. अशा स्थितीत निवडणुका घेणे संयुक्तिक राहणार नाही, ही बाब घ्यानात येऊन राज्याच्या सहकार विभागाने सहाव्यांदा या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने ६ एप्रिल रोजी आदेश काढला आहे. त्यात ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २०१९ अखेर मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५३० आणि २०२० अखेर मुदत संपलेल्या ५२६ अशा एकूण १ हजार ५६ सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टनंतर होणार आहेत.
सहकारी सोसायट्या व बॅंकांचा समावेश
निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांमध्ये जवळपास २७५ सहकारी सोसायट्या, मजूर, औद्यगिक, गृह निर्माण सोसायट्यांसह सावजी अर्बन बॅंक, महेश नागरी सहकारी बँक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्था आणि महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था आदी सहकारी संस्थांचा समावेश आहे.