स्थायीसह ७ विषय समित्यांच्या सभापतींची निवड बारगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST2021-04-14T04:15:43+5:302021-04-14T04:15:43+5:30
सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळेना महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवड करण्यापूर्वी सदस्यांची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन ...

स्थायीसह ७ विषय समित्यांच्या सभापतींची निवड बारगळली
सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळेना
महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवड करण्यापूर्वी सदस्यांची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करून सभागृहातील संख्याबळानुसार विविध पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्याची निवड करून त्यांची नावे सर्वसाधारण सभेत ठेवली जातात. या सभेत संबंधित नावाला मंजुरी दिल्यानंतर ही यादी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येते. त्यानंतर विभागीय आयुक्त सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करतात. त्यांच्या आदेशानुसार या निवडणुकीचे निर्वाचन अधिकारी जिल्हाधिकारी असतात. ही प्रशासकीय प्रक्रिया असली तरी मनपाची सर्वसाधारण सभाच गेल्या ६ महिन्यांत झालेली नाही. त्यामुळे सदस्यांची निवडही झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात मनपाची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा झाली होती. त्यावेळी स्थायीचे सभापती पद रिक्त असल्याने मनपा आयुक्तांनीच अर्थसंकल्प सादर केला होता.
विरोधी पक्षच अस्तित्वात नाही
महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे; पण ते नावालाच आहे. कारण या पक्षाने एकीकडे विरोधी पक्ष म्हणून मनपाच्या प्रशासकीय सुविधा मिळविल्या आहेत, तर दुसरीकडे सभापती पद मिळवत सत्तेचा लाभही घेतला आहे. त्यामुळे या पक्षाची मनपातील भूमिका चकित करणारी आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना या पक्षांना यात चुकीचं आहे, असं काहीही वाटत नाही. त्यामुळे तेही चुप्पी साधून आहेत.