परभणी : रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीने चांगलाच दणका दिला आहे. गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
गंगाखेड येथील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतले होते. हे प्रकरणी ईडी कडे गेल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे विविध बँकामधून कर्ज उचलून ती रक्कम गुट्टे यांनी गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातूनच त्यांच्या योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पावर लिमिटेड इतर कंपन्यांमध्ये गुंतवली. या मालमत्तांवर आता ईडीने कारवाई केली आहे. बुधवारी रात्री उशिरा ईडीकडून गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड २४७ कोटी किमतींची यंत्र त्याचप्रमाणे ५ कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पावर लिमिटेडच्या परभणी बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकी आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेड यांची १ कोटी १० लाख रुपये किमतीचे समभाग अशी २५५ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.
काय आहे नेमके प्रकरणपरभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने २०१७ साली २९ हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर ६ बँकाकडून तब्बल ३२८ कोटींचे कर्ज उचलले होते. जेंव्हा याबाबत शेतकऱ्यांना बँकांनी नोटीसा पाठवल्या तेंव्हा हे प्रकरण उजेडात आले होते. गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने व बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले, त्याचबरोबर उस पुरवला. त्या परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातीलही असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागदपत्र तयार करून पाच राष्ट्रीयकृत बँका ज्यात आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक तर मुंबईची रत्नाकर बँक याच्याकडून तब्बल ३२८ कोटींची रक्कम परस्पर उचलली.