सातबारावर महिलांचे नाव आल्यास आर्थिक समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST2021-01-04T04:15:13+5:302021-01-04T04:15:13+5:30
परभणी : शेतातील ८० टक्के कामांत महिलांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. पेरणी, खते देणे, कोळपणी, काढणी आदी कामांत त्यांचा सहभाग ...

सातबारावर महिलांचे नाव आल्यास आर्थिक समृद्धी
परभणी : शेतातील ८० टक्के कामांत महिलांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. पेरणी, खते देणे, कोळपणी, काढणी आदी कामांत त्यांचा सहभाग असतो. परंतु शेतीमाल विपणन प्रक्रिया व आर्थिक बाबतीत मात्र त्यांचा सहभाग नसतो. महिला प्रत्येक काम बारकाईने आणि नियोजनबद्धपणे करतात. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी सातबारावर महिलांचे नाव असले पाहिजे, असे प्रतिपादन लातूर येथील सामाजिक कार्यकर्त्या आशाताई भिसे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व सामुदायिक विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी ऑनलाइन शेतकरी मेळावा पार पडला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आशाताई भिसे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी.बी. देवसरकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, मुख्य शिक्षण अधिकारी डॉ.व्ही.बी. कांबळे आदींची उपस्थिती होती.
आशाताई भिसे म्हणाल्या, बचत गट चळवळीमुळे महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढत आहे. आज महिला बचत गटामुळे महिलाही कुटुंबाला आर्थिक आधार देत आहेत. राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे निर्माण होत आहे. परंतु शेतातील कामांत मोठा सहभाग असणाऱ्या महिलांचाही उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या पाहिजेत, शेतमाल आधारभूत किंमत ठरविताना महिलांचे शेतकामातील कष्टाच्या मोलाची नोंद घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू अशोक ढवण म्हणाले, गेल्या नऊ महिन्यात विद्यापीठाच्या वतीने अनेक कार्यशाळा, मेळावे ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आले. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. कृषी विद्यापीठाच्या संशोधनातही शेतकरी महिला केंद्रबिंदू ठेवून संशोधन कार्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात डाॅ. जयश्री रोडगे, वर्षा मारवाळीकर, डाॅ.जया बंगाळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. वीणा भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मेधा उमरीकर यांनी आभार मानले.