माझे धोतर फेडण्याची भाषा करू नका, तुमची पँट फेडेन; रत्नाकर गुटेंनी खासदारांना डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:44 IST2025-01-04T16:43:03+5:302025-01-04T16:44:12+5:30
परभणीत आमदार रत्नाकर गुट्टेंनी पुन्हा खासदार संजय जाधव यांना डिवचले

माझे धोतर फेडण्याची भाषा करू नका, तुमची पँट फेडेन; रत्नाकर गुटेंनी खासदारांना डिवचले
गंगाखेड : माझे धोतर फेडून दाखवा, अन्यथा तुमची पँट काढून नाही पाठवली, तर नावाचा आमदार रत्नाकर गुट्टे नाही, असे वक्तव्य गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खासदार संजय जाधव यांच्या निवडणुकीदरम्यानच्या वक्तव्याचा समाचार घेताना केले. गुरुवारी रात्री तालुक्यातील माखणी येथील सत्कार समारंभात आ. गुट्टे यांनी पुन्हा खासदारांना डिवचले आहे.
यावेळी गुट्टे म्हणाले की, निवडणूक प्रचारात मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर बोलत होतो. मात्र, खासदार संजय जाधव हे निवडणुकीत माझे व माझ्या कार्यकर्त्यांचे धोतर फेडण्याची भाषा करत होते. यानिमित्ताने मी खुले चॅलेंज देतो की, त्यांनी माझे धोतर फेडून दाखवावे अन्यथा मी तुमची पँट काढून नाही दाखवली, तर आमदार रत्नाकर गुट्टे नाव सांगणार नाही. जाधव यांनी आता जिल्ह्यातील उबाठा गट सांभाळण्याची क्षमता ठेवावी. मी परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांचे जाळे उखडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच दिला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारात जाधव यांनी गुट्टे यांच्यावर वेळोवेळी टोकाची व जहरी टीका केली होती. निवडणुकीत न बोलणारे गुट्टे जिंकल्यानंतर खासदारांवर तोंडसुख घेत आहेत. खासदारांचीच रणनीती त्यांच्यावर वापरली जात आहे. निवडणूक संपली तरीही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ही चिखलफेक अशीच सुरू राहण्याची चिन्हे आहेत. तेच ते ऐकून वैतागलेल्या जनतेला मात्र विकासावर बोलण्याची अपेक्षा असून, त्यावरही ही मंडळी बोलणार की असेच तोंडसुख घेत राहणार? असा प्रश्न पडत आहे.
खासदार-आमदारांत जुनेच राजकीय वैर
खासदार संजय जाधव व गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे या दोघांत नेहमीच राजकीय आरोप - प्रत्यारोप, तसेच टीकेची जोरदार पार्श्वभूमी राहिलेली आहे. खासदार जाधव यांनी आमदार गुट्टे यांच्याविरोधात गंगाखेड शुगर कारखान्याच्या माध्यमातून मोर्चा काढत टोकाची टीका केलेली आहे. आमदार गुट्टे यांनीही परभणी शहरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत शहराच्या बकाल अवस्थेवरून खासदारांना छेडले होते.