दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरु नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST2021-05-06T04:18:04+5:302021-05-06T04:18:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची मुदत संपल्यानंतरही लस घेणे आवश्यक आहे. केवळ मुदत संपली म्हणून ...

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरु नका!
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची मुदत संपल्यानंतरही लस घेणे आवश्यक आहे. केवळ मुदत संपली म्हणून घाबरुन जाण्याचे कारण नाही, उशिराने लस घेतल्यासही कोरोनापासून तेवढीच सुरक्षितता प्राप्त होते. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक नागरिकांची दुसऱ्या डोसची तारीख निघून गेली आहे. त्यामुळे आता लसीचा परिणाम होतो की नाही? अशी संभ्रमावस्था आहे. मात्र, कोरोनाची पहिली लस घेतल्यानंतर नागरिकांमध्ये बऱ्यापैकी प्रतिपिंडे (ॲन्टीबॉडीज) निर्माण होतात. त्यामुळे दुसऱ्या डोसची तारीख संपल्यानंतर थोडे उशिराने जेव्हा लस प्राप्त होईल, तेव्हा घेतली तरी काहीही हरकत नाही. मात्र, प्रत्येकाने दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे. तेव्हा लस घेण्यास उशीर झाला म्हणून घाबरु नये. उशिराने लस घेतली तरी ती तेवढीच परिणामकारक ठरते. त्यामुळे दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेली तरीही प्रत्येकाने जेव्हा लस प्राप्त होईल तेव्हा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
८ ते १० आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा
कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस ८ ते १० आठवडे या दरम्यान घेतल्यास काहीच हरकत नाही.
कोवॅक्सिन या लसीसाठी ४ ते ८ आठवड्यांदरम्यान केव्हाही लसीचा दुसरा डोस घेता येतो.
राज्य शासनाने हे मार्गदर्शन आरोग्य विभागाला घालून दिले आहे. तेव्हा याकाळात लस घेता येते.
प्रत्येकाने घ्यावा दुसरा डोस
दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्याने घाबरुन जाण्याचे कारण नाही. लस घेण्यासाठी थोडासा विलंब लागला तरीही चालतो. लसीचा पहिला डोस घेतल्याने बऱ्यापैकी ॲन्टीबॉडीज तयार होतात. त्यामुळे दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तरी चालेल. मात्र, तारीख निघून गेली म्हणून लस घेतली नाही, असे व्हायला नको. प्रत्येकाने दुसरा डोस घेतला पाहिजे.
डॉ. रावजी सोनवणे, माता, बाल संगोपन अधिकारी.