दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST2021-04-20T04:17:57+5:302021-04-20T04:17:57+5:30
परभणी : फुफ्फुसांच्या सदृढतेसाठी रक्तातील ऑक्सिजनची कमतरता पाहण्याकरिता नागरिकांनी घरच्या घरीच दररोज सहा मिनिटे वॉक टेस्ट करण्याचा सल्ला आरोग्य ...

दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट!
परभणी : फुफ्फुसांच्या सदृढतेसाठी रक्तातील ऑक्सिजनची कमतरता पाहण्याकरिता नागरिकांनी घरच्या घरीच दररोज सहा मिनिटे वॉक टेस्ट करण्याचा सल्ला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिला आहे.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वत्र झपाट्याने वाढ आहे. त्यामध्ये ऑक्सिजनची गरज अनेक रुग्णांना लागत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजाराची लागण होऊन गंभीर स्थिती निर्माण होण्याच्या वेळी धावपळ करण्यापेक्षा नागरिकांनी फुफ्फुसांच्या सदृढतेसाठी रक्तातील ऑक्सिजनची कमतरता पाहण्याकरिता घरच्या घरीच दररोज सहा मिनिटे वॉक टेस्ट करण्याचा महत्त्वाचा सल्ला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिला आहे. या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात येईल. जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले. त्यामुळे ही महत्त्वाची चाचणी करणे प्रत्येक नागरिकाच्या हिताचे आहे.
अशी करा चाचणी
आपल्याला बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी.
कोणी करायची ही टेस्ट?
सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील तर... गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी दररोज ही चाचणी करावी.
...तर घ्या काळजी
सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी होत असेल तर चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती, त्या पातळीपेक्षा तीन टक्केपेक्षा अधिक कमी होत असेल, ६ मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम किंवा धाप लागत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
असे लागणार साहित्य
घड्याळ, पल्स ऑक्सिमीटर