परभणी : राज्य शासनाच्या राज्यसेवा आयुक्तालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यासाठी दहा नवीन रुग्णवाहिका मंजूर झाल्या असून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांनी दिली.
राज्यातील आरोग्य संस्थांसाठी नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार परभणी जिल्हा परिषदेतून रुग्णवाहिकांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली असून, जिल्ह्यासाठी १० रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. गंगाखेड तालुक्यासाठी ३, सेलू तालुक्यासाठी २, जिंतूर, परभणी, पूर्णा, पालम आणि सोनपेठ या तालुक्यांसाठी प्रत्येकी एक रुग्णवाहिका दिली जाणार आहे. प्राप्त झालेल्या रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित केल्या जाणार असून, त्यात गंगाखेड तालुक्यातील कोद्री, पिंपळदरी, मरडसगाव, जिंतूर तालुक्यातील आसेगाव, सेलू तालुक्यातील चिकलठाणा, वालूर, परभणी तालुक्यातील आर्वी, पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव आणि पालम तालुक्यातील बनवस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका दिली जाणार असल्याची माहिती निर्मलाताई विटेकर यांनी दिली.