१९ तासांत जिल्हा रुग्णालयात दुसऱ्यांदा आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:45+5:302021-02-08T04:15:45+5:30
परभणी : शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच १९ ...

१९ तासांत जिल्हा रुग्णालयात दुसऱ्यांदा आग
परभणी : शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच १९ तासांनी रविवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास याच परिसरातील धोबीघाटाला आग लागली. या दोन्ही घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर अडगळीतील फर्निचरला आग लागल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली होती. रात्रीच्या वेळी अचानक आग लागल्याने रुग्ण, नातेवाइकांची एकच धावपळ उडाली. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी दीपक कानोडे, फायरमन मदन जाधव, डी.यू. राठोड, गणेश गायकवाड, वाहनचालक सय्यद इनायत अली यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग अटोक्यात आणली. या घटनेला काही तास उलटताच सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रुग्णालय परिसरातील धोबीघाटाला पुन्हा आग लागली. या आगीत धोबी घाटातील उषा, गाद्या, बेडसीट व इतर साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाने धाव घेत आग नियंत्रणात आणली. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या घटना गंभीर आहेत. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात फायर आणि इलेक्ट्रॉनिक ऑडिट करण्यात आले आहे. असे असतानाही आगीच्या घटना झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही घटनांतील आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, डॉ.किशोर सुरवसे आदींनी घटनास्थळी भेट दिली. नानलपेठ पोलिसांनीही तातडीने अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त नियुक्त केला होता.
धोबी घाटाला दुसऱ्यांदा आग
जिल्हा रुग्णालय परिसरातील धोबी घाट परिसरात एक महिन्यापूर्वीच आग लागली होती. त्याच वेळी या ठिकाणी उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा आग लागली.
चौकशी समिती गठित
शनिवारी रात्री बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशीसाठी समिती गठित केली आहे. या समितीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त शल्यचिकित्सक पी.के. डाके, मनपाचे उपायुक्त गायकवाड, निवासी उपजिल्हािधकारी डॉ. किशोर सुरवसे यांचा समावेश आहे.