२१ गावांना तत्काळ अनुदान वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:12+5:302021-02-06T04:30:12+5:30
सेलू : वालूर महसूल मंडळातील २१ गावांना या अनुदान प्रक्रियेतून वगळल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले असून, तातडीने या ...

२१ गावांना तत्काळ अनुदान वाटप करा
सेलू : वालूर महसूल मंडळातील २१ गावांना या अनुदान प्रक्रियेतून वगळल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले असून, तातडीने या गावांना अनुदान जाहीर करण्याची मागणी सेलू दबावगटाच्या वतीने शुक्रवारी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.
वालूर महसूल विभागातील गावे ही प्रामुख्याने दुधना नदीच्या किनाऱ्यालगत असून या महसूल मंडळात ऑक्टोबर महिन्यापर्यंत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत या विभागातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी नुकसानीबाबतचे पंचनामेदेखील केले आहेत. तसेच यावर्षी झालेला सततचा पाऊस व लोअर दुधना धरणातून पाऊस सुरू असताना दुधना नदीपात्रात दोन वेळा पाण्याचा विसर्गदेखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याने नदीकाठच्या नाले, ओढे यांमध्ये तसेच अतिवृष्टीने झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी शेतीमध्ये साचून वालूर मंडळातील २१ गावांमधील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, याची माहिती व जाणीव तहसीलदार व कृषी अधिकारी यांना असतांनाही त्यांनी या नुकसानीकडे दुर्लक्ष करून या भागात अतिवृष्टी झालेली नाही, अशी चुकीची माहिती शासनाकडे पाठविल्याचे कळते. त्यामुळे वालूर महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने व नदी नाल्याचे पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान होऊनही केवळ चुकीच्या तांत्रिक माहितीच्या आधारे या मंडळातील २१ गावांना अतिवृष्टीचे अनुदान मिळू शकले नाही, ही बाब वालूर मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.
तालुक्यातील केवळ ९४ गावांपैकी ७३ गावे मदतीच्या निकषांत बसल्याचे महसूल प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे; परंतु वालूर मंडळातील २१ गावांना जाणीवपूर्वक वगळले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.,यामुळे तातडीने या २१ गावांनाही शासनाने जाहीर केले. प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांप्रमाणे अनुदान द्यावे, अन्यथा १६ फेब्रुवारीपासून साखळी पद्धतीने उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर दबाव गटाचे निमंत्रक ॲड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, सतीश काकडे, जयसिंग शेळके, दत्तराव आंधळे, ॲड. देवराव दळवे, सय्यद जलाल, विलास रोडगे, योगेश काकडे, मधुकर सोळंके, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे, गुलाबराव पोळ, दिलीप शेवाळे, मुकुंद टेकाळे, केशव डोईफोडे, रामप्रसाद शिंदे, इसाक पटेल, ॲड. योगेश सूर्यवंशी, आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.