निम्न दुधना प्रकल्पातून नदीपाञात पाणी सोडले; तीन तालुक्यातील ५० गावांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 14:21 IST2021-05-28T14:18:19+5:302021-05-28T14:21:33+5:30
नदीकाठावरील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने शुक्रवारी दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपाञात पाणी सोडले आहे.

निम्न दुधना प्रकल्पातून नदीपाञात पाणी सोडले; तीन तालुक्यातील ५० गावांना दिलासा
सेलू ( परभणी ) : दुधना नदीकाठावरील गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने निम्न दुधना प्रकल्पातून शुक्रवारी सकाळी ९. ३० वाजता ६ दरवाजे उघडून नदीपाञात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठावरील परभणी, मानवत आणि सेलू या तीन तालुक्यातील ५० गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.
मे महिन्यात दुधना नदी काठावरील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नदीकाठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी दुधना नदीपाञात आहेत. पंरतु, पाणी पातळीत घट झाल्याने नदीकाठावरील गावांना पाणी पुरवठा करतांना ग्रामपंचायतींना कसरत करावी लागत आहे. तसेच ग्रामस्थांना पाण्यासाठी भंटकती करण्याची वेळ आली होती. पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभागाला १९ मे रोजी पञ देऊन नदीपाञात पाणी सोडण्याची सुचना केली होती. त्यानंतर जिपचे अग्रीम पाणीपट्टी पञाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी प्रकल्पाचे १, २०,२, १९ हे चार दरवाजे २० सेंमी ने तर १८ व ३ क्रमांकाचे १० सेंमी दरवाजे उचलून ३०५६ क्युसेस विसर्ग नदीपाञात सोडण्यात आला आहे. दुधना प्रकल्प ते पूर्णा संगमापर्यंतचे ६८ किमी अंतर आहे. संगमापर्यंत पाणी पोहचण्यासाठी ४१ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.नदीपाञात पाणी सोडल्याने सेलू तालुक्यातील १७ परभणी तालुक्यातील २५ तर मानवत तालुक्यातील ८ अशा एकूण ५० गावांची तहान भागणार आहे. दरम्यान, परभणीचे आ.डाॅ राहूल पाटील यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.
१२.७७ दलघमी पाणी लागणार
नदीकाठावरील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने शुक्रवारी दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपाञात पाणी सोडले आहे. टेल पर्यंत पाणी जाण्यासाठी १२. ७७ दलघमी एवढे पाणी लागणार असल्याचे प्रकल्पाच्या सुञांनी सांगितले. दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत ६९ टक्के जिवंत जलसाठा आहे.