सोनपेठ तालुक्यात विकासकामांना खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:32+5:302021-04-17T04:16:32+5:30
भारनियमन बंद करण्याची मागणी परभणी : तालुक्यातील उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपरी देशमुख येथे भारनियमन सुरू आहे. मात्र, सध्या रमजान महिना ...

सोनपेठ तालुक्यात विकासकामांना खीळ
भारनियमन बंद करण्याची मागणी
परभणी : तालुक्यातील उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपरी देशमुख येथे भारनियमन सुरू आहे. मात्र, सध्या रमजान महिना सुरू होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वतीने रमजान महिन्यामध्ये भारनियमन रद्द करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्यात कोरोना चाचण्या ठप्प
परभणी : कोरोना चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या रॅपिड ॲण्टिजेन आणि आरपीसीआर किट संपत आल्याने परभणी शहर महापालिकेच्या सहा केंद्रांवरील चाचण्या १५ एप्रिल रोजी सकाळपासून बंद होत्या. त्यामुळे किट मिळविण्यासाठी मनपाचे कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात बसून होते. तसेच शहराबरोबरच जिल्ह्यातही रॅपिड ॲण्टिजेन किटचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यात कोरोना चाचण्या ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.
बांधकाम साहित्य रस्त्यावर
परभणी : शहरातील विविध कॉलन्यांत सुरू असलेल्या बांधकामांचे साहित्य रस्त्यावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परभणी शहर महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील बांधकाम साहित्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
कोरोना केंद्रातील सांडपाणी उघड्यावर
परभणी : शहरातील आयटीआय येथील कोरोना केंद्राचे सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
लसीकरण बंद पडण्याची भीती
परभणी : कोरोना लसीचा अपेक्षित पुरवठा जिल्ह्याला होत नसल्याने पुन्हा एकदा लसीकरण बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या लसी नागरिकांना देण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ लस मिळविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा
परभणी : कोरोना रुग्णांना लागणारे इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची हेळसांड होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन रेमडेसिविर व ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
मोफत वाळू उपलब्ध करून द्या
पूर्णा : रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या अनेक घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. जिल्हा प्रशासनाने काही वाळूधक्क्यांचे लिलाव केले असले, तरी घरकुल लाभार्थ्यांना मात्र माफक दरात वाळू मिळत नाही. त्यामुळे या घरांचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे या घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी तालुका प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.
विनापरवाना दारू, गुटखा वाहतूक वाढली
लिंबा : पाथरी तालुक्यातील लिंबा परिसरात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री करण्याच्या उद्देशाने होणारी विनापरवाना दारू व गुटखा वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अवैध दारू, गुटखाविक्री करणा-यांना मोकळे रान सुटले आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ
परभणी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता संसर्ग लक्षात घेता परभणी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. मात्र, आजही शहरातील रस्त्यावरून विनामास्क व सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष करून नागरिक फिरताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याकडे तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
मांडवा रस्त्याच्या कामांना मिळेना गती
परभणी : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तालुक्यातील मांडवा ते जलालपूर पाटी या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावर संबंधित कंत्राटदाराने गिट्टी अंथरून ठेवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यासाठी निधी उपलब्ध असतानाही मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी मांडवा ग्रामस्थांमधून होत आहे.
रिक्त पदांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सलाइनवर
वस्सा : जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे हे आरोग्य केंद्र सलाइनवर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या केंद्रांतर्गत येणा-या ३५ हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे केंद्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोविडच्या काळात आरोग्य सेवा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.