सेलू येथे विकास कृती समिती गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:43+5:302021-02-08T04:15:43+5:30
सेलू शहरातील हिंदी- मराठी ग्रंथालयात ७ फेब्रुवारी रोजी नागरिकांच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगराध्यक्ष ...

सेलू येथे विकास कृती समिती गठित
सेलू शहरातील हिंदी- मराठी ग्रंथालयात ७ फेब्रुवारी रोजी नागरिकांच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, त्र्यंबकराव बोराडे, डी.व्ही. मुळे, रामकृष्ण शेरे, नंदकिशोर बाहेती, विजय बिहाणी, डॉ. विलास मोरे, मिलिंद सावंत, दत्तराव आंधळे, मजीद बागवान, सदाशिव निकम, विलास रोडगे, डाॅ. अरविंद बोराडे, विनोद तरटे, दत्तराव मगर, रहीम पठाण, डा. ऋतुराज साडेगावकर, सुभाष चव्हाण, सर्जेराव लहाने यांची उपस्थिती होती. या बैठकीत निम्न दुधना प्रकल्पांतर्गत उर्वरित प्रलंबित कामे, तालुकांतर्गत रस्ते दुरुस्ती, महामार्गाला जोडणारा रस्ता, विद्युत वितरण कंपनीचा १३२ के.व्ही. रद्द झालेला प्रकल्प उभारणे, सेलूसाठी स्वतंत्र बस डेपो, तरुण वर्गाला हाताला काम मिळावे यासाठी एम.आय.डी.सी.चा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेणे, उपजिल्हा रुग्णालयात प्रलंबित ५० खाटांची मान्यता मिळविणे व नेत्रचिकित्सालय सुरू करणे, देवगाव फाटा ते सेलू शहराला जोडणारा मोरेगाव येथील दुधना नदीवरील पूल वाहतुकीसाठी मोकळा करणे, रेल्वे उड्डाणपूल, देवगाव फाटा ते इंजेगाव या महामार्गाच्या कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रलंबित विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्यामुळे हे प्रश्न जैसे थे आहेत. सेलू शहराचा नावलौकिक कायमस्वरूपी राहावा, यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन सेलू तालुक्याच्या विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, हा विचार पुढे आला. शासनदरबारी पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुका विकास कृती समिती गठित करण्यात आली असून, यामध्ये सर्कलनिहाय ३१ सदस्य असतील, असे सांगण्यात आले. या बैठकीत नगराध्यक्ष विनोद बोराडे, हेमंतराव आडळकर, त्र्यंबकराव बोराडे, डी.व्ही. मुळे, रहीम पठाण, मिलिंद सावंत, डॉ. ऋतुराज साडेगावकर, दत्तराव आंधळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. विलास मोरे यांनी केले.