बाजारपेठ भागातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST2021-02-15T04:16:31+5:302021-02-15T04:16:31+5:30
शहरात जलवाहिनीला गळती परभणी : शहरातील जुन्या जलवाहिनीला अनेक भागांत गळती लागली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नळाला पाणी ...

बाजारपेठ भागातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
शहरात जलवाहिनीला गळती
परभणी : शहरातील जुन्या जलवाहिनीला अनेक भागांत गळती लागली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नळाला पाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. उन्हाळ्याला प्रारंभ झाला असून, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता मनपा प्रशासनाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
जिल्हा कचेरीत वाहनतळाचा बोजवारा
परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहनतळासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहनधारक वाहनतळावर वाहने उभी करण्याऐवजी थेट प्रवेशद्वारापर्यंत वाहने नेतात. त्यामुळे नागरिकांना वाहनांचा अडथळा पार करून कार्यालयात प्रवेश करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता प्रशासनाने नियम डावलणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
दुभाजकावरील झाडे सुकू लागली
परभणी : शहरातील वसमत रोड आणि जिंतूर रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर झाडे लावली आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ही झाडे आता सुकू लागली आहेत. मनपा प्रशासनाने पाणी देण्याचे नियोजन केल्यास झाडे टिकून राहतील.
पूल उभारण्याच्या कामाला गती
परभणी : गंगाखेड रस्त्यावर शहरालगत पिंगळगड नाल्यावर पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला असून, पूल उभारण्याच्या कामाला गती मिळाली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा पूल धोकादायक झाला होता. नवीन पुलाची उभारणी होत असल्याने वाहनधारकांचा प्रश्न निकाली निघाला आहे.
ग्रामीण भागातील वातावरण पुन्हा तापू लागले
परभणी : सहकार क्षेत्रातील सोसायट्या आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आगामी काळात होत असल्याने ग्रामीण भागात आतापासूनच वातावरण तापू लागले आहे. सहकारी सेवा सोसायट्यांना ग्रामीण भागात महत्त्व आहे. त्यामुळे या सोसायट्या आपल्याच ताब्यात राहाव्यात, यासाठी राजकीय मंडळींनी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपाठोपाठ आता सोसायट्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.
स्टेडियम भागात स्वच्छतागृहाचा अभाव
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरामध्ये स्वच्छतागृह नसल्याने व्यावसायिक आणि नागरिकांची अडचण होत आहे. या भागात दररोज शेकडो नागरिक कामानिमित्त येतात. मात्र, स्वच्छतागृह नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मनपाने स्वच्छतागृहांची उभारणी करणे गरजेचे झाले आहे.