पूर्णेत शेतकऱ्याच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या हरीणास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 16:33 IST2018-07-03T16:32:35+5:302018-07-03T16:33:48+5:30
: तालुक्यातील खांबेगाव शिवारातील विहिरीत पडलेल्या हरीणास शेतकऱ्यांनी सतर्कतेने बाहेर काढत जीवदान दिले.

पूर्णेत शेतकऱ्याच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या हरीणास जीवदान
पूर्णा (परभणी) : तालुक्यातील खांबेगाव शिवारातील विहिरीत पडलेल्या हरीणास शेतकऱ्यांनी सतर्कतेने बाहेर काढत जीवदान दिले. त्याच्यावर ताडकळस येथील पशुवैदकीय दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी कि, खांबेगाव येथे ग्यानोजी जोंधळे यांची शेती आहे. आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांना शेतातील विहिरीत हरीण पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस पाटील माधव दुधाटे यांनी दिली. यानंतर दोघांनी प्रयत्नपूर्वक त्या हरीण विहिरातून बाहेर काढले. यानंतर हरीणास मारोती कांबळे यांच्या मदतीने ताडकळस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथे डॉ. बिराजदार यांनी प्राथमिक उपचार केले. हरीणाची तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती ठीक असल्यास त्यास परत वन परिक्षेत्रात सोडून देणार असल्याचे वनपाल चंद्रमोघे यांनी सांगितले आहे.
हरीणाची प्रकृती चिंताजनक
परभणी वनविभागाचे एक पथक ताडकळस येथे आले असता त्यांनी हरीणाची तपासणी केली. यावेळी हरिणाच्या कमरे खाली व कानाजवळील भागाला जबर दुखापत झाली असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्याच्यावरील पुढील उपचार परभणी येथे करण्यात येणार आहेत असे या पथकाने सांगितले.