६८ दिवसांनंतर थांबले बाधितांचे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:17+5:302021-06-09T04:22:17+5:30
परभणी : कोरोना संसर्ग काळात २० एप्रिलपासून सुरू झालेले बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र अखेर ८ जून रोजी थांबले. दिवसभरात ...

६८ दिवसांनंतर थांबले बाधितांचे मृत्यू
परभणी : कोरोना संसर्ग काळात २० एप्रिलपासून सुरू झालेले बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र अखेर ८ जून रोजी थांबले. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने, तब्बल ६८ दिवसांपासून सुरू असलेले मृत्यू अखेर मंगळवारी थांबले आहेत.
कोरोना लाटेच्या दुसऱ्या टप्प्यात बाधित रुग्णांच्या वाढलेल्या संख्येबरोबरच दररोज रुग्णांचे मृत्यू होत असल्याने चिंता वाढल्या होत्या. १९ मार्च रोजी जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. नवीन रुग्ण संख्याही २००च्या आसपास होती. मात्र, २० मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले. सुरुवातीला ३ ते ४ रुग्णांचे दररोज मृत्यू होत होते. ही संख्या पुढे २२ रुग्णांपर्यंत पोहोचली. मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत असल्याने, जिल्हावासीय चांगलेच धास्तावले होते. मागच्या तीन-चार आठवड्यांपासून कोरोनाचा हा संसर्ग कमी झाला असला, तरी दररोज रुग्णांचा मृत्यू होत असल्याने चिंता कायम होत्या. ८ जून रोजी मात्र एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने घेतली नाही. मृत्यूची संख्या शून्यावर आल्याने खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी आरोग्य विभागाला १ हजार ७४७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ४६ अहवालांमध्ये १७ आणि रॅपिड टेस्टच्या ७०१ अहवालांमध्ये ८ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात एकूण २५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० हजार २८४ झाली असून, ४८ हजार ३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४९ एवढी आहे. सध्या ९९६ रुग्ण उपचार घेत आहेत.
१९१ रुग्ण कोरोनामुक्त
मंगळवारी दिवसभरात १९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कोरोनामुक्तीचा वाढलेला दर, बाधित रुग्णांची आणि मृत्यूची घटलेली संख्या याबाबत जिल्ह्यासाठी समाधान देणाऱ्या ठरत आहेत.