पाथरी : तुझ्या शेतातून पाणी आमच्या शेतात आल्याने मशागत करता येत नाही यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि एका शेतकऱ्याच्या डोक्यात खोरे घालून तिघांनी गंभीर जखमी केले. ही घटना तालुक्यातील मरडसगाव येथे सोमवारी ( दि. १७ ) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरोधात मंगळवारी रात्री ( दि. १८ ) उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील रामेश्वर गणेश शिंदे यांचे गावालगत शेतजमीन आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या शेतातील पाणी शेजारच्या जमिनीत गेल्याच्या कारणावरून आदिनाथ परमेश्वर काळे, परमेश्वर प्रबतराव काळे, ऋषिकेश परमेश्वर काळे या तिघांनी त्यांच्यासोबत वाद घातला. पाणी आल्याने शेताची मशागत करता येत नाही असा आरोप करत त्यांनी रामेश्वर यांच्या डोक्यात खोऱ्याने वार केला. तसेच रामेश्वर यांच्या पोटात दगड मारून शिवीगाळ करत लाथाबुक्याने जबर मारहाण केली. यात रामेश्वर गंभीर जखमी झाले आहेत. जखमी रामेश्वर यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर मंगळवारी रात्री रामेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून आदिनाथ परमेश्वर काळे, परमेश्वर प्रबतराव काळे, ऋषिकेश परमेश्वर काळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.