चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेला चल माझ्या दोस्ता! पाथरीत रस्त्याच्या दुरावस्थेने चिमुकल्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:38 IST2025-07-26T14:35:16+5:302025-07-26T14:38:55+5:30

पाथरी तालुक्यातील मसला खुर्दची जिल्हा परिषद शाळा गावापासून दूर असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे

Dad, there's mud on the road, how can we go to school! The plight of the children due to the poor condition of the road | चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेला चल माझ्या दोस्ता! पाथरीत रस्त्याच्या दुरावस्थेने चिमुकल्यांचे हाल

चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेला चल माझ्या दोस्ता! पाथरीत रस्त्याच्या दुरावस्थेने चिमुकल्यांचे हाल

- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी) :
पप्पा, शाळेच्या रस्त्यावर चिखल आहे, आम्ही शाळेत कसे जाऊ! हे वाक्य सध्या पाथरी तालुक्यातील मसला खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या तोंडी वारंवार ऐकायला मिळत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे व चिखल झाल्याने लहान मुलांना रोजच जीव मुठीत धरून शाळेत जावे लागते. पालकांची धास्ती वाढली असून, त्यांनी याबाबत शालेय व्यवस्थापन समिती मार्फत ग्रामपंचायतीपासून गटविकास अधिकारीपर्यंत निवेदने देण्यात आली आहेत.

पाथरी तालुक्यातील मसला खुर्दची जिल्हा परिषद शाळा गावापासून दूर आहे. पहिली ते पाचवीपर्यंत असलेल्या शाळेत 68 विद्यार्थी असून 3 शिक्षक आहेत. सध्या पावसामुळे शाळेच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असून, विद्यार्थ्यांना चिखलातून धडपडत शाळेत पोहोचावे लागते. चिखलात घसरून पडल्याने अनेक मुलांनी तर शाळेत जाणेच बंद केले असून शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.

शालेय व्यवस्थापन समितीकडून तक्रार 
पालक व शालेय व्यवस्थापन समितीने दोन वेळा ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामसेवकांना निवेदन दिले, मात्र अद्याप रस्ता दुरुस्तीची कामे सुरू झाली नाहीत. शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय कावळे म्हणाले, आम्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. जर तातडीने दखल घेतली नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रशासनाला तातडीने हस्तक्षेपाची मागणी
मसला खुर्दसारख्या ग्रामीण भागातील शाळेत आधीच विद्यार्थीसंख्या घट, शिक्षकांची कमतरता अशा समस्या आहेत. त्यात शाळेचा रस्ता दुरुस्तीअभावी बंद पडल्यास शिक्षणावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे ग्रामस्थ व पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दर पावसाळ्यात आम्ही अशीच धावपळ करतो, तरी रस्त्याच्या कामात काही सुधारणा नाहीत, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. तर शाळेत जाण्यासाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध नसल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांचा शाळेतून दाखला मागण्याची वेळ आली आहे. 

लवकरच रस्ता दुरुस्त करू 
ग्रामपंचायतमार्फत या रस्त्यावर मुरूम टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसामुळे काम लांबले, चार दिवसात मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करू. 
- गोविंद देशमुख, ग्राम पंचायत अधिकारी, मसाला खु ता पाथरी

Web Title: Dad, there's mud on the road, how can we go to school! The plight of the children due to the poor condition of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.