रमजानच्या उलाढालीला संचारबंदीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:49+5:302021-04-18T04:16:49+5:30
परभणी : मुस्लिम समाजबांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला १४ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. संचारबंदी तसेच नियमांचे पालन करुन धार्मिक ...

रमजानच्या उलाढालीला संचारबंदीचा फटका
परभणी : मुस्लिम समाजबांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला १४ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. संचारबंदी तसेच नियमांचे पालन करुन धार्मिक विधी पार पाडले जात आहेत. मात्र, यानिमित्ताने बाजारपेठेत होणारी खरेदी-विक्री दुकाने बंद असल्याने ठप्प झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना संचारबंदीचा फटका सहन करावा लागत आहे.
गतवर्षी देशभरात लावलेल्या कडक लाॅकडाऊनमध्ये रमजानचा महिना आणि ईद साजरी करण्यात आली होती. यंदा परिस्थिती बदलेल, असे वाटत असताना राज्यात रुग्ण वाढत असल्याने नुकतीच संचारबंदी लावली आहे. रमजान महिन्याला १४ एप्रिलपासून सुरुवात झाली. पुढील ३० ते ३१ दिवस रमजानचे रोजे पाळले जातात व त्यानंतर रमजान ईद साजरी केली जाते.
रमजान महिना सुरु होण्यापूर्वी १० दिवस आधी बाजारपेठेत विविध साहित्य राज्यासह परराज्यातून व्यापारी आणतात. यंदाही साहित्य तर व्यापाऱ्यांनी मागवले, मात्र रमजानच्या सुरुवातीचे १५ दिवस संचारबंदी लागू असल्याने बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. त्यामुळे माल आणण्यासाठी केलेली गुंतवणूक १५ दिवस विक्रीशिवाय पडून राहणार आहे. त्यामुळे छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
धार्मिक विधीला पाचजणांची परवानगी
मशिदीमध्ये रमजान महिन्यात होणारी नमाज पठण, फर्ज आणि अन्य धार्मिक विधीसाठी प्रशासनाने केवळ पाचजणांना परवानगी दिली आहे. त्याचे पालन करत शक्यतो घरातच नमाज अदा करणे सुरु असल्याचे समाजातील नागरिकांनी सांगितले.
फळे, खजूरची घरपोच विक्री
रोजा काळात धरलेला उपवास सोडण्यासाठी विविध फळांसह, खजूर आणि अन्य खाद्यपदार्थांची विक्री नियमांचे पालन करत गल्लीतील विक्रेत्यांनी घरपोच देण्याची व्यवस्था शहरातील अनेक भागात सुरु केली आहे. त्यामुळे किरकोळ खरेदीसाठी बाहेर जाण्याचे टाळले जात आहे.
बाजार उघडण्याची प्रतीक्षा
कपडे, शिरखुर्मा साहित्य, अत्तर, चप्पल, बूट आणि महिलांची साडी, ड्रेस या सर्व साहित्याची दुकाने बंद आहेत. ह्या विक्रेत्यांना दुकाने उघडण्याची तर ग्राहकांना हे साहित्य खरेदी करण्याची प्रतीक्षा लागली आहे.