हयात प्रमाणपत्रासाठी ज्येष्ठांची कोरोना काळात बँकेसमोर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST2021-02-27T04:23:41+5:302021-02-27T04:23:41+5:30
परभणी जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ, विधवा, परित्यक्त्या व दिव्यांग अशा पाच योजनांतर्गत जिल्ह्यात ९६ ...

हयात प्रमाणपत्रासाठी ज्येष्ठांची कोरोना काळात बँकेसमोर गर्दी
परभणी जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ, विधवा, परित्यक्त्या व दिव्यांग अशा पाच योजनांतर्गत जिल्ह्यात ९६ हजार ७३६ निराधार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना प्रतिमहा १ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. मात्र, दरवर्षी या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र बँकेला सादर करावे लागते. शुक्रवारी केलेल्या पाहणीत हयातीचा दाखला मिळविण्यासाठी या निराधार लाभार्थ्यांची कोरोना काळातही लांबच लांब रांग शहरातील बँकांसमोर दिसून आली. त्यामुळे एकीकडे शासन, प्रशासन कोरोना काळात ज्येष्ठांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहे. तर दुसरीकडे या योजनांचा लाभ घेऊन आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालत आहे. यासाठी बँक प्रशासनाकडून कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे निराधारांची ससेहोलपट सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
ज्येष्ठांनी या वयात घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे असताना त्यांना घराबाहेर पडून बँकेच्या दारात गर्दीत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने कोरोना काळात या निराधार लाभार्थ्यांना हयात दाखला घरपोच देण्यासाठी प्रयत्न करावेत. बँक व तालुका प्रशासनाच्या समन्वयातून निराधार लाभार्थ्यांच्या हयात प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.