जीपच्या अपघातप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:43+5:302021-06-04T04:14:43+5:30
वाशिम जिल्ह्यातील बाळखेडा येथील गजानन तुकाराम सोनवणे हे २० मे रोजी एमएच २८-एझेड २६४१ क्रमांकाच्या क्रुझर जीपने बाळखेडा येथून ...

जीपच्या अपघातप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा
वाशिम जिल्ह्यातील बाळखेडा येथील गजानन तुकाराम सोनवणे हे २० मे रोजी एमएच २८-एझेड २६४१ क्रमांकाच्या क्रुझर जीपने बाळखेडा येथून पंढरपूरकडे मजुरी करण्यासाठी कुटुंबीयांसह जात होते. या दिवशी रात्री १ च्या सुमारास सेलू ते पाथरी रोडवर कुंडी शिवारातील अंदाजे एक किमी अंतरावर जीपचालक योगेश भारत गिरी याने भरघाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवले. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी या जीपने तीन पलट्या खाल्ल्या. या अपघातात गजानन सोनवणे यांना व त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली. यावेळी काही व्यक्तींनी त्यांना उपचारासाठी सेलू येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून परभणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असताना त्यांनी पोलिसांना जबाब दिला. त्यावरून वाहन चालक योगेश भारत गिरी याच्या विरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अपघातानंतर किराणा साहित्य गायब
गजानन सोनवणे यांच्या जीपला कुंडी शिवारात अपघात झाल्यानंतर ते व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना तातडीने सेलू येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. यावेळी अपघातग्रस्त जीप जागेवरच होती. या जीपमध्ये असलेले सोनवणे यांचे किराणा व अन्य साहित्य गायब झाले. तशी नोंद त्यांनी पोलीस तक्रारीत केली आहे. त्यामुळे काहींनी अपघातग्रस्त जागेवरून हे साहित्य लंपास केल्याचे समोर आले आहे.