मंगळवारपासून ‘पणन’कडून कापूस खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:36+5:302021-02-08T04:15:36+5:30
गंगाखेड : तालुक्यात पणन महासंघाकडून ४ खरेदी केंद्रावर सुरू असलेली कापूस खरेदी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ९ फेब्रुवारीपासून बंद ...

मंगळवारपासून ‘पणन’कडून कापूस खरेदी बंद
गंगाखेड : तालुक्यात पणन महासंघाकडून ४ खरेदी केंद्रावर सुरू असलेली कापूस खरेदी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ९ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय पणन महासंघाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी एकच दिवस शिल्लक राहिला आहे.
पणन महासंघाकडून गंगाखेड तालुक्यात चार जिनिंगवर कापूस संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी जाहीर हमीभावनुसार कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ७०० रुपयांचा भाव देण्यात येत आहे. मात्र, कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना वेळेत पैसे न मिळणे, विविध कागदपत्रांची मागणी करणे त्याचबरोबर महिनाभरापासून खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव वधारले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आता आपला कापूस या पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे विक्रीसाठी घेऊन जाण्याऐवजी खासगी जिनिंग व्यापारी व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच विक्री करू लागला आहे. त्याचबरोबर या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे पणन महासंघाने सुरू केलेल्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी खासगी बाजारपेठेतील भाव वधारेपर्यंत चांगलीच गर्दी केली होती. मात्र, आता खासगी बाजारपेठेतच आपला कापूस विक्री करण्याकडे कल दिला आहे. मागील काही दिवसांपासून या केंद्राकडून अपेक्षित कापसाची खरेदी होत नाही. त्यामुळे ९ फेब्रुवारीपासून पणन महासंघाकडून सुरू केलेले कापूस खरेदी केंद्र बंद करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी आता पणन महासंघाकडे कापूस विक्रीस नेण्यासाठी परभणी येथे नेण्यात यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक संदीप तायडे, सचिव राजेभाऊ गायकवाड यांनी केले आहे.
आठ दिवसांत १ हजार क्विंटल कापसाची खरेदी
कापूस हंगामाच्या सुरुवातीला आठ दिवसांच्या कालावधीमध्ये या चार खरेदी केंद्रांकडून १० हजारांपेक्षा अधिक क्विंटल कापसाची खरेदी करण्यात येत होती. मात्र, आता खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव वधारले आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात पणन महासंघाच्या चार केंद्रांवर केवळ ३१ शेतकऱ्यांनी आपल्याकडील १ हजार ३० क्विंटल कापसाची विक्री केली आहे.