ऑनलाइन सातबारा उताऱ्यामध्ये होणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:54+5:302021-02-05T06:06:54+5:30
परभणी : जिल्ह्यातील ऑनलाइन त्रुटींच्या सातबारा उताऱ्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तालुका आणि मंडलस्तरावर शिबिरे घेण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर ...

ऑनलाइन सातबारा उताऱ्यामध्ये होणार दुरुस्ती
परभणी : जिल्ह्यातील ऑनलाइन त्रुटींच्या सातबारा उताऱ्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तालुका आणि मंडलस्तरावर शिबिरे घेण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिल्या आहेत.
ई-फेरफार प्रणालीमध्ये राज्यातील १०० टक्के सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण झाले आहे. या संगणकीकृत सातबाराच्या अधारे दस्त नोंदणी केली जाते. यामध्ये अचूकता येण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जातात. असे असताना सातबारा उताऱ्यामध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक खातेदार ई-मेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे अडचणी मांडतात. काही खातेदार ई- हक्क प्रणालीद्वारे सातबारामधील दुरुस्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करतात. मात्र तरीही त्यात दुरुस्ती होत नाही. सातबारा उतारा दुरुस्तीसाठी आतापर्यंत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करणे आवश्यक आहे. तेव्हा सातबारा दुरुस्तीसाठी तालुका आणि मंडलस्तरावर आठवड्यातून एक दिवस शिबिर घेण्याच्या सूचना डॉ.कुंडेटकर यांनी दिल्या आहेत. संगणकीकृत सातबारा उताऱ्यामधील एकही चूक आता तहसीलदारांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे या शिबिरांसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तेव्हा सातबारा दुरुस्तीसाठी नवीन अर्ज स्वीकारणे, जुन्या हस्तलिखित अभिलेखांवरून खात्री करणे, तलाठी यांनी कलम १५५ चे ऑनलाइन प्रस्ताव दाखल करणे, तहसीलदारांनी ऑनलाइन सातबारांना मान्यता देणे आदी कामे या शिबिरांमधून करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
९८ टक्के सातबारांची दुरुस्ती
जिल्ह्यातील १०० टक्के सातबारा ऑनलाइन प्रणालीवर नोंद झाल्या आहेत. या सातबारांमध्ये चुका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चावडी वाचन, एडीट, रि-एडीटसह कलम १५५ च्या आदेशानुसार दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यांचा वापर करून सातबारा दुरुस्तीचे ९८ टक्के उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे.