CoronaVirus : धक्कादायक ! परभणीत कोरोनाचा शिरकाव, पुण्याहून परतलेला वाहनचालक पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 13:23 IST2020-04-16T13:10:50+5:302020-04-16T13:23:09+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु

CoronaVirus : धक्कादायक ! परभणीत कोरोनाचा शिरकाव, पुण्याहून परतलेला वाहनचालक पॉझिटीव्ह
परभणी: शहरात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला असून, त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.
पुणे येथून ११ एप्रिल रोजी रात्री वाहनचालक असलेला एक तरुण परभणी शहरात दाखल झाला. १३ एप्रिल रोजी त्याला त्रास होत असल्याने स्वत:हून तो जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याची तपासी करुन त्याचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल गुरुवारी प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये सदरील तरुणाचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. सदरील तरुणाच्या घरातील सर्व सदस्यांनाही क्वॉरंटाईन करण्यात येणार असून, परिसरही कॉन्टेंटमेंट करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे मुगळीकर म्हणाले.
सीमा बंद असताना जिल्ह्यात प्रवेश
जिल्ह्याच्या सीमा कडकडीत बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अनेक ठिकाणी याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु असली तरीही सीमेवरील पोलिसांना चकमा देवून अनेक जण जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. या पार्श्वभुमीवर हा २१ वर्षीय तरुणही असाच जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी दाखल झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या सीमांवरील बंदोबस्तावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.